स्नेहा मोरे, घुमान (संत नामदेवनगरी) श्री भगत नामदेव दरबार म्हणजेच नामदेवांच्या समाधी स्थळी वर्षानुवर्षे सर्व धर्मांचा दरबार भरतो आहे. या दरबारात गुरुग्रंथसाहिब, ख्रिश्चन, शिवमंदिर, गणेश मंदिर, राधाकृष्ण मंदिर आणि हनुमान मंदिर अशी सर्व प्रार्थनास्थळे आहेत. त्यामुळे या दरबारात सर्व जात,धर्म आणि पंथाची माणसे एकत्र जमतात.या दरबाराची सेवा आणि व्यवस्थापनाचे काम संत नामदेव यांचे पंजाबमधील पहिले शिष्य बोहरदास यांचे वंशज सांभाळत आहेत. या वंशाचे बावा समाजाचे अठराव्या पिढीतील तारसेनसिंग बावा हे दरबाराच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळत आहेत. अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली याच समाजातील अठरा सदस्यांची कार्यकारिणी धुरा सांभाळत नामदेव आणि बोहरदास यांच्या विचारांचा प्रसार करत आहेत. या दरबारात दररोज सकाळी सुकमनीचा पाठ होतो. त्यानंतर कथा किर्तन असते. सायंकाळी रेहरासचा पाठ केल्यानंतर दिवसाची अखेर होते. दरबारात आलेल्या भक्ताला‘कराह’ म्हणून गोड पदार्थ प्रसाद म्हणून देतात. या दरबारात बारा तास लंगर सुरू असतो. या दरबारात नामदेवांच्या जयंतीनिमित्त ‘प्रकाशवर्ष’ साजरे केले जाते. या उत्सवात नामदेवांच्या विचारांचा भजन, किर्तन आणि नामस्मरणातून जप केला जातो.
येथे भरतो सर्व धर्मांचा दरबार
By admin | Published: April 06, 2015 2:57 AM