भारताच्या बहुतांश भागांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलग्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. मुलींचा उल्लेख परक्याचं धन असा केला जातो. तसेच लग्नानंतर मुलीला निरोप दिला जातो. हीच परंपरा जगातील अनेक देशांमध्ये सुरू आहे. मात्र भारतातील मेघालय, आसाम आणि बांगलादेशाच्या काही भागात राहणाऱ्या खासी समुदायामध्ये उलट पद्धत आहे. या समुदायामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींना अधिक महत्त्व दिले जाते. या जमातींमध्ये मुलींच्या जन्मानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो. तर मुलगा झाल्यावर काही खास आयोजन होत नाही.
खासी जमातीमध्ये मुलांना परक्याचं धन समजलं जातं. तर मुलींन आणि मातांना देवाच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो. ही जमात पूर्णपणे मुलींच्या प्रती समर्पित आहे. ही जमात त्या सर्व समूह आणि क्षेत्रांसाठी एक आदर्श आहे जे मुलींच्या जन्मामुळे दु:खी होतात. आजसुद्धा आपल्या देशातील एक मोठी लोकसंख्या मुलीच्या जन्माला ओझं मानते. मात्र आता हळुहळू लोकांचं मत बदलत आहे. खासी जमातीमध्ये अनेक अशा परंपरा आणि प्रथा आहेत, ज्या भारतातील इतर जमातींपेक्षा एकदम भिन्न आहेत.
खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगे मुलीसोबत सासरी राहायला जातात. जुसऱ्या शब्दात सांगायचं तर या जमातीमध्ये मुली आयुष्यभर आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. तर मुलगे आपलं घर सोडून घरजावई म्हणून राहतात. त्याला अपमान समजला जात नाही. तसेच या जमातीमध्ये वडीलोपार्जित संपत्ती ही मुलग्यांना न मिळता मुलींना मिळते. एका पेक्षा अधिक मुली असल्यास सर्वात छोट्या मुलीला अधिक वाटा मिळतो. सर्वात छोट्या मुलीला अधिक संपत्ती मिळाल्याने तिलाच आई-वडील आणि अविवाहित भावा बहिणींच्या संपत्तीची देखभाल करावी लागते.
दरम्यान, खासी जातीमध्ये महिलांना अनेक विवाह करण्याची सवलत दिली जाते. येथील पुरुषांनी अनेकदा ही प्रथा बदलण्याची मागणी केलेली आहे. ते सांगतात की, ते महिलांना कमीपणा देऊ इच्छित नाही. तसेच त्यांच्या आधिकारांवरही गदा आणायची नाही. मात्र आम्ही आमच्यासाठी बरोबरीचे हक्क मागत आहोत. या समुदायातील कुटुंबांवर महिलांचा वरचष्मा दिसून येतो. मेगालयमधील गारो, खासी, जैतिया आदी जातींमध्ये अशा प्रकारची मातृसत्तात व्यवस्था दिसून येते.