ऑनलाइन लोकमत
अलवर, दि. 27 - काही दिवसांपुर्वी गाईंची वाहतूक करत असल्याने मारहाण करण्यात आलेल्या पहलू खान यांचा मृत्यू झाला आणि राजस्थानमधील अलवर जिल्हा चर्चेत आला. या घटनेमुळे अलवर जिल्ह्यात धार्मिक भेदभाव असतील असा समज होणं स्वाभाविक आहे. मात्र येथील परिस्थिती पुर्णपणे वेगळी आहे. अलवर जिल्ह्याला अत्यंत जवळून ओळखणार लोक सांगतात जसा समज पसरत आहे तसा हा जिल्हा नाही. अलवर जिल्ह्याची योग्य माहिती हवी असल्यास मोती डुंगरी डोंगरावर स्थित धार्मिक स्थळी जाणं गरजेचं आहे.
हे धार्मिक स्थळ म्हणजे जातीय सलोख्याचं उदाहरण आहे. येथे एकाच ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन वेगवेगळ्या धर्माचे लोक आपापल्या पद्धतीने पूजा, प्रार्थना करतात. या धार्मिक स्थळी एकीकडे सैय्यद दरबार दर्गा आहे तर दुसरीकडे हनुमानाचं मंदिर आहे. दोघांमध्ये फक्त एक भिंत आहे. हिंदुत्व आणि इस्लाम एकत्र नांदू शकतात हेच दोन्ही धर्माचं धार्मिक स्थळ एका ठिकाणी उभं राहून सांगत आहेत.
याठिकाणी भजनासाठी वापरण्यात येणारी सामग्री मुस्लिमही वापरतात. या परिसरात भगवे आणि हिरवे झेंडे एकत्र फडकताना दिसतात.
या परिसरात मंदिराच्या गेटमधून प्रवेश केला जातो. लोक आधी मंदिरात जाऊन हात जोडून प्रार्थना करतात. आणि त्यानंतर दर्ग्यात जातात. येणारा प्रत्येकजण दोन्ही ठिकाणी त्याच मनोभावे भक्तीने प्रार्थना करतो. 51 वर्षीय महंत नवल बाबा या धार्मिक स्थळाची देखभाल करतात. जेव्हा काही लोक मंदिर आणि मशीद एकत्र पाहिल्यावर आश्चर्य व्यक्त करतात तेव्हा येथील लोक त्यावर आक्षेप घेत मंदिर आणि मशीद एकच मार्ग शिकवते. मग एकत्र का असू नये ? असा साधा प्रश्न विचारतात.