त्रियुग नारायण तिवारी -
अयोध्या : २२ जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येत येण्याची तयारी करू नका. घरी राहूनच सर्वांनी श्रीरामज्योती प्रज्वलित करा, दिवाळीसारखा सण साजरा करा आणि असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशवासीयांना केले.
अयोध्या धाम रेल्वेस्थानक आणि नव्याने उभारण्यात आलेल्या महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण झाले. तसेच दोन नव्या अमृत भारत रेल्वे व सहा वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखविला.
त्यानंतर सभेत मोदी म्हणाले, आजच्याच दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान येथे स्वातंत्र्याचा जयघोष केला होता. त्याच पावन पर्वावर स्वातंत्र्याच्या अमृतकाळातील संकल्पास आपण पुढे नेणार आहोत. देशाला मोठी वारसा संस्कृती लाभली आहे. त्यास विकासाची जोड दिल्यास देश नक्कीच प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल. आपल्या देशाचा वारसा भविष्याचा योग्य मार्ग दाखविते. त्यामुळेच आजचा भारत हा प्राचीन आणि नव्या गोष्टींना आत्मसात करत पुढे जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अमृत भारत रेल्वेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
देशभरातील मंदिरात स्वच्छता कार्यक्रम २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर लोकांनी त्यांच्या सोयीनुसार येथे येण्याचे नियोजन करावे. लगेच येण्याची घाई करू नये. या क्षणाची आपण ५०० वर्षे वाट पाहिली, तर आणखी काही दिवस वाट पाहण्यात काहीही नुकसान होणार नाही. १४ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत तीर्थक्षेत्र आणि देशातील प्रत्येक मंदिरात स्वच्छतेचे कार्यक्रम घेण्यात यावेत.
तीर्थयात्रेचा वारसाआपल्या देशाला प्राचीनकाळापासून तीर्थयात्रेचा वारसा लाभला आहे. गंगोत्री ते गंगासागर यात्रा, १२ ज्योतिर्लिंग यात्रा, चार धाम यात्रा, कैलाश मानसरोवर यात्रा असे अनेक उदाहरणे देता येईल. हे भारताचे मोठे वैशिष्ट्य असल्याचे मोदी म्हणाले.
देशाला दिशा...अयोध्यानगरीतून आपल्याला नवी ऊर्जा मिळत आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून अयोध्येला देशाच्या नकाशावर पुन्हा नव्याने आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी काळात अयोध्या ही केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर संपूर्ण देशाला विकासासाठी दिशा देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांवर पुष्पवृष्टीजाहीर सभेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या धाममध्ये १५ किमीचा रोड शो केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने अयोध्येतील साधू-संत, विद्यार्थी आणि संस्कृत विद्वानांनी पंतप्रधानांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी केली. रोड शोच्या मार्गावर अनेक कलावंत, विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.