नवी दिल्ली : हिरो मोटो कॉर्पची बनावट वेबसाईट बनवून फ्रँचायजी देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. कंपनीचे खरे युआरएल heromotocorp.com असे असताना ठगांनी heromotocorps.com असे केवळ एस जोडून हुबेहुब युआरएल बनवत हा गंडा घातला आहे. दिल्ली पोलीस या ठगांचा शोध घेत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण खरे असल्याचे सांगितले आहे. बनावट वेबसाईटवर खऱ्या वेबसाईटनुसार नव्या शोरुमसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. तसेच हुबेहुब माहिती भरण्याचे रकानेही ठेवण्यात आले होते. याचबरोबर 2 लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आली होती. हा अर्ज भरणाऱ्या लोकांना या ठगांनी ऑनलाईन आणि फोनद्वारे संपर्क साधला होता. तसेच दोन लाख रुपये आता भरावेत, ते पुन्हा परत करण्यात येतील असेही सांगण्यात आले होते. यामुळे काही व्यापारी सतर्क झाले व त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. यानंतर हे प्रकरण उघड झाले.
या बनावट युआरएलला एका प्रसिद्ध डोमेन रजिस्टर आणि वेब होस्टिंग कंपनीद्वारे बनविण्यात आले होते. या वेबसाईटला 7 जूनला बनविण्यात आले होते. पोलीस वेबसाईटचा आयपी अॅड्रेस आणि व्यापाऱ्यांना केलेल्या फोन नंबरची माहीती गोळा करत आहे.