नवी दिल्ली - जगभरातील आपले सर्व प्लांट बंद केल्यानंतरही हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार नाही. हिरोने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातील आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद केले आहेत. हिरोचे कोलंबिया आणि बांग्लादेशबरोबरच भारतातील राजस्थान आणि निमराणा येथे ग्लोबल पार्ट्स सेंटर आहे. हे आता 31 मार्च 2020पर्यंत बंद करण्यात आले आहे. याशिवाय हिरोने या महिन्याच्या अखेरपर्यंत वाटपाहण्यापेक्षा 23 मार्च 2020पर्यंत कॉन्ट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यांचे वेतन फास्ट ट्रॅक करण्याचेही नियोजन केले आहे.
हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे, की सुरक्षितता आणि कल्याण या दोन गोष्टी नेहमीच कंपनीची प्राथमिकता राहत आल्या आहेत. यांच्याच आधारावर आम्ही, भारत, कोलंबिया आणि बांगलादेशबरोबरच निमराणातील ग्लोबल पार्ट्स सेंटरसह (GPC) सर्व प्रकारची जागतीक पातळीवरील उत्पादनासदर्भातील कामे 31 मार्च 2020पर्यंत बंद करत आहोत. या परिस्थितीत सर्वांवरच आर्थिक ताण पडण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही वचनबद्ध आहोत.
गेल्या 20 मार्चला डिजिटल टाउन हॉलच्या माध्यमाने आमचे चेयअमन पवन मुंजाल यांनी सर्व कर्माचाऱ्यांची नोकरी आबाधित राहील, असे स्पष्ट केले आहे.
एवढेच नाही, महिन्याच्या अखेरच्या तारखेपूर्वीच म्हणजेच सोमवारी 23 मार्चलाच आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टवरील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही हिरोने म्हटले आहे.
जे नॉन-प्रोडक्शन कर्मचारी आहेत त्यांना हिरोने घरूनच काम करायला सांगितले आहे. हे कर्मचारी घरूनच दैनंदिन कामे करणार आहेत. हिरो शिवाय एफसीए ग्रुप इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि होंडा टू व्हीलर्स यांनीही तत्काळ आपले प्लांटदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 89 वर -
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 89वर पोहोचली असून, त्यांच्यावर सध्या कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. तर राज्यात कोरोनानं आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यानं कलम 144 लागू केलं असून, मुंबईतली लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या बंद केलेल्या आहेत. तसेच लोकांना 31 मार्चपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.