पाकिस्तानसोबत आजपर्यंत झालेल्या चारही युद्धांत भारतीय लष्कराने दैदिप्यमान कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीत लढतानाही लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांनी शौर्य दाखवत भारतीय सैन्याची ताकद जगाला दाखवून दिली. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून भूगोल बदलला. या पराक्रमाचे विजयी सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त 'लोकमत'ने घेतलेला आढावा.
पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्यांनी अन्वयित अत्याचार केल्याने ३ डिसेंबर १९७१ ला भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. या युद्धात भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटने आणि मराठा रेजिमेंटने ढाकाला वेढा घालत पाकिस्तानी सैन्याची कोंडी केली. त्यामुुळे बांगलादेशची निर्मिती झाली, असे मत या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी 'लोकमत'ला सांगितले.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. तसेच पाकिस्तानचा जन्म झाला. तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान तयार झाले. १५ डिसेंबर १९७१ च्या रात्री पाकिस्तानचा पराभव झाला. यालाच बांग्लादेश युद्ध असे म्हणतात. १४ डिसेंबरलाच हा निर्णय झाल्याने १५ डिसेंबरला पूर्व पाकिस्तानावर विजय मिळवल्याने बांग्लादेशाच्या निर्मितीची घोषणा करण्याचे ठरले होते. हे शक्य झाले ते मराठा रेजिमेंन्टच्या कामगिरीमुळे. द्वितीय महायुद्धानंतर पूर्ण जगात पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या पॅराशुट रेजिमेंन्टच्या २ पॅरा रेजिमेंटचे सैनिक (ज्याचे सर्व सैनिक हे महाराष्ट्राचे होते) विमानाने ढाकाच्या सीमेवर विमानाने उतरले. जवळपास ७० विमाने या मोहिमेत वापरली होती. या सैनिकांना ढाका येथील नदीवरील पूल ताब्यात घेण्याची जबाबदारी होती. हे काम २ पॅराने १२ डिसेंबरच्या रात्री केले. तेथे फर्स्ट मराठा रेजिमेंटला पॅरारेजिमेंटच्या सैनिकांना संपर्क करण्याचे आदेश दिले. या दोन्ही रेजिमेंटनी मिळून ढाक्याला चारही बाजूने वेढा देत पूर्ण मार्ग बंद केले. या मोहिमेच्या एक दिवसाआधी ढाक्याजवळील हीली क्षेत्रावर मराठा रेजिमेंटच्या २२ बटालियनने ताबा मिळवला. अशा प्रकारचा विजय हा जगातील युद्धातील पहिलाच विजय होता. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅराशूटच्या साह्याने शत्रुप्रदेशात उतरत एखाद्या मोठ्या प्रदेशावर ताबा मिळवणे हे भारतीय सैनिकांनी करून दाखवले. दुसरी गोष्ट त्याच दिवशी १३ तारखेच्या रात्री २ पॅराचे कॅप्टन निर्भय शर्मा हे रात्री पूर्व पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी कमांडर जनरल नियाजी यांना भेटायला गेले. त्यांनी नियाजी यांच्यासमोर बिनशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले. युद्ध तुम्ही हरला आहात. आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नाही. आत्मसमर्पण हाच एकच पर्याय उरल्याचे सांगितले.
ढाक्यामध्ये १६ डिसेंबरला आत्मसमर्पण केले जाईल असे ठरले. भारतीय सैन्याचे पूर्वेचे कमांडर लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर त्यांनी व त्यांच्या सैनिकांनी शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केले. जवळपास ९३ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. ही घटना जगात झालेल्या आतापर्यंतच्या युद्धात कधीच झाली नाही. ते भारतीय सैन्यांनी करून दाखवले. पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानात केलेल्या अत्याच्यारामुळे ही घटना त्यांच्यावर ओढवली गेली.
केवळ ९८ जवानांनी जिकंले नैनाकोट.... २९ नोव्हेंबर १९७१ रोजी गुरुदासपूर येथे लष्कराच्या बेसकॅम्पवर जवानांशी संवाद साधण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. जवळपास ८५ अधिकारी आणि ४ हजार जवानांसोबत त्यांनी जवळपास अर्धा तास संवाद साधला. यानंतर आमचे प्रमुख जनरल व्ही. पी. सिंग यांनी पंतप्रधान आमच्यासोबत नास्ता करणार असल्याचे सांगितले. यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, जनरलसाहब रूकीये... नास्ता हमे अगले हद पे, यॅहा नही उस पार करना है.. काही दिवसांतच युद्ध सुरू होईल याची माहिती नव्हती; पण गांधींच्या त्या वाक्याला सर्वांनी भरभरून दाद दिली अन काही दिवसांत युद्ध सुरू झाले.
१९७१ च्या युद्धाची चाहूल लागली होती. ग्वाल्हेर येथे युद्धप्रात्यक्षिके सुरू होती. कर्नल सदानंद साळुंखे यांची पोस्टिंग पंजाबमध्ये होती. साळुंखे यांची कंपनी सर्वांत पुढे रावी नदीच्या ठिकाणी तैनात होती. शत्रूला रोखण्यासाठी सप्टेंबर १९७१ महिन्यापासून बंकर तसेच खंदके बांधण्यास सुरुवात केली होती.३ तारखेला माझ्या कंपनीला शत्रूच्या सीमेत जाऊन टेहळणी करण्याची सूचना मिळाली. ६ डिसेंबर १९७१ ला आम्हाला पुन्हा नव्या ठिकाणी जाण्याचे आदेश मिळाले. रावी नदीपासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नैनाकोट या ठिकाणी जाण्याचे आम्हाला आदेश मिळाले. 'ऑपरेशन कॅक्टस लिली' या मोहिमेंतर्गत '६ मराठा लाईट इन्फन्ट्री'च्या ९८ जवानांचे नेतृत्व माझ्याकडे होते. कडाक्याच्या थंडीत आम्ही रावी नदी पार केली. या ठिकाणी शत्रूंनी भूसुरूंग पेरले. होते. आम्हाला हल्लाचे आदेश नव्हते, फक्त रात्रीच्या वेळी शत्रूला चकवायचे होते. भारतीय १९ डिसेंबरला मोठा हल्ला दुसऱ्या बाजूने करणार होती. तोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी थांबायचे होते. भूसुरूंगामुळे आम्ही आहे त्या ठिकाणी थांबलो. ७ डिसेंबरला विमानाने आमच्यावर हल्ले झाले. मात्र, आम्ही अमृतसरवरून हवाई मदत मागितली.
भारतीय विमानांनीही त्यांना सळो की पळो केले. त्यातही शत्रूचे दोन टँक आमच्याकडे वळले. मात्र, आमच्यासाठी लावलेल्या भूसुरूंगाचे तेच लक्ष्य ठरले. आम्हाला परवानगी नसतानाही आम्ही हल्ला करण्याचा निर्णय घेतला. केवळ ९८ जवानांच्या जोरावर शिवाजी महाराजांचा गजर करत आम्ही नैनाकोट जिंकले. १४ डिसेंबर रोजी आणखी एक पराक्रम केला. शत्रूच्या मुलखात घुसून दारूगोळा व शस्त्रास्त्रे घेऊन प. पाकमधून नूरको ते सियालकोट अशी जाणारी शत्रूची रेल्वेगाडी रुळावर घसरावी, या हेतूने रेल्वेमार्गाच्या फिशप्लेट्स काढत अमेरिकन दारूगोळा घेऊन निघालेली गाडी रूळावरून घसरली. यामुळे शत्रूची हानी झाली.
विजय दिवसातून पाकिस्तान-चीनला संदेशविजय दिवस साजरा करत असताना पाकिस्तान-चीनला यातून संदेश जाणार आहे. भारतीय भूमीवर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. भारत कधी कुणाच्या भूमीवर अतिक्रमण करत नाही. मात्र, शेजारील शत्रू ओळखून शस्त्रसज्य राहणे हीकाळाची गरज आहे.
बसंतरची लढाई१९७१ च्या लढाईतील बसंतरची एक निर्णायक लढाई होती. पाकिस्तानमधील बसंतर येथे भारत आणि पाकिस्तानी सैन्यात घनघोर युद्ध झाले. यात भारतीय सैन्यांनी पाकिस्तानची एक इफंट्री ब्रिगेड तसेच ६० रणगाडे नष्ट केले. पाकिस्तानी सैन्याने भारतीयांची वाट अडवण्यासाठी भूसुरूंग पेरले होते. हे भुसुरूंग निकामी करण्याची जबाबदारी मूळचे पुण्याचे असलेले तेव्हाचे लेफ्टनंट कर्नल बी. टी. पंडित यांच्यावर होती. त्यांच्या पथकाने चार दिवसांत होणारे काम एका रात्रीत केल्याने भारतीय रणगाडे आणि सैनिकांना पाकिस्तानच्या पंजाबमध्ये ३० किमी अंतरापर्यंत मजल मारता आली.
हीलीची लढाईबांगलादेश मुक्तिसंग्रामातील हीलीची एक अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. ढाकाजवळील बोगरा पूल ताब्यात घेण्याचे आदेश भारतीय सैन्यांना मिळाले होते. भारतीय लष्कराच्या २२ मराठा इफंट्री बटालीय आणि ४ पॅरा बटालियनने विमानातून शत्रूप्रदेशात पॅराशूटच्या साह्याने उतरत या पुलावर नियंत्रण मिळवले होते. यामुळे ढाका शहराच्या चारही सीमा बंद करण्यास भारतीय जवानांना आले होते. यामुळे पूर्व पाकिस्तानातील सैनिकांची कोंडी करण्यास यश आले.
लाँगेवालाची निर्णायक लढाईराजस्थान येथील लाँगेवाला येथील लढाई १९७१च्या युद्धातील महत्त्वाची लढाई होती. पाकिस्तानच्या २ ते ३ हजार सैनिक आणि ५० रणगाड्यांना या पोस्टवरील केवळ १२० सैनिकांनी संपूर्ण रात्रभर झुंजत ठेवले. या लढाईचे नेतृत्व मेजर कुलदिपसिंग चांदपुरी यांनी केले होते.
..............आपल्या सैन्याची ताकद आता खूप वाढली आहे. पाकिस्तानातून सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची समस्या खूप मोठी आहे. त्याविरोधात खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. आपली गुप्तचर यंत्रणा, अंतर्गत सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करायला हवी.- अशोक शिंदे, निवृत्त एअर कमोडोर (वीरचक्र विजेते)
......................................................
हुतात्मा अशोक ढवळे यांना वीरपदक का नाही? वीरपत्नी अनुराधा अशोक ढवळे यांची सल
मंजूर केलेली जमीनही देण्याची अपेक्षापुणे : देशासाठी ५० वर्षांपूर्वी मी माझे कुंकू गमावले आहे. पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. लष्कराने त्याबद्दल आम्हाला सर्व काही दिले. पण त्यांना वीरपदक न मिळाल्याची खंत कायम असल्याची सल हुतात्मा फ्लाईट लेफ्टनंट अशोक ढवळे यांच्या वीर पत्नी अनुराधा ढवळे यांनी 'लोकमत'कडे व्यक्त केले. सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानित करावे. तसेच त्यांना मंजूर केलेली जमीन देण्याची अपेक्षाही व्यक्त केली. मूळचे पुण्यातील असलेले अशोक ढवळे यांनी १९६२ मध्ये हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. त्यांच्या कामगिरीमुळे अनेक ठिकाणी बढत्या मिळाल्या. १९७१ च्या युद्धावेळी सांब सेक्टरमध्ये त्यांना पाठविले. या काळात भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाचे ढग दाटू लागले होते. ३ डिसेंबरला प्रत्यक्ष युद्धाला सुरूवात झाली. पाकिस्तानचे हवाई हल्ले थोपवण्यासाठी तसेच प्रतिहल्ला करण्यासाठी त्यांची निवड केली. अशाच एका हल्ल्यात ८ डिसेंबरला त्यांचे विमान बेपत्ता झाले.
सुरूवातीला ते बेपत्ता असल्याचे कळाले. मात्र, ११ डिसेंबरला ते हुतात्मा झाल्याचा निरोप मिळाला. त्या वेळी मी अवघ्या २३ वर्षांची तर ते २८ वर्षांचे होते. या युद्धात बेपत्ता असलेले किंवा हुतात्मा झालेल्या ५४ जणांची यादी सरकारने जाहीर केली. मात्र, त्यावेळी वृत्तपत्रांनी ते बेपत्ता असून, पाकिस्तानच्या कारागृहात असल्याची बातमी दिली होती. यामुळे ते परत येतील अशी आशा होती. २००१ पर्यंत आम्ही त्यांची वाट पाहिली.
बेनझीर भुट्टो यांच्याशी पत्रव्यवहार
अशोक ढवळे बेपत्ता झाल्यावर त्यांच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय माध्यमांनी जवळपास ५४ जण पाकिस्तानमध्ये असल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे ते परत येतील, अशी आशा होती. शासकीय पातळीवरही त्यांन शोधण्यासाठी प्रयत्न केले. एवढेच नाही तर बेनझीर भुट्टो यांच्याशीही पत्रव्यवहार अनुराधा यांनी केला. मात्र, याचा काही उपयोग झाला नाही.
शब्दांकन : निनाद देशमुख