नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हीन शब्दात टीका केली. मोदीजी, तुम्ही किती बिनधास्त खोटं बोलता, तुम्हाला थोडीही लाज वाटत नाही का ? असा प्रश्न राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींना विचारला आहे. पंतप्रधान मोदींनी अमेठी येथे केलेल्या भाषणाचा संदर्भ देत राहुल यांनी मोदींवर टीका केली आहे.
अमेठीतील शस्त्रास्त्र कारखान्याचे उद्धाटन मी स्वतः 2010 मध्ये केले होते. गेल्या काही वर्षांपासून तेथून शस्त्रास्त्रे बनविली जात आहेत. रविवारी तुम्ही अमेठीला गेला आणि आपल्या स्वभावाप्रमाणे पुन्हा एकदा खोटे बोललात. तुम्हाला, खरंच लाज वाटत नाही का? असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. रविवारी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीत सभा घेतली. यावेळी भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने साकार झालेल्या 'एके-203' या रायफलींच्या निर्मिती कारखान्याचा प्रारंभ मोदींच्या हस्ते झाला. त्यावेळी मोदींनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. मोदींच्या या टीकेला राहुल गांधींनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल यांच्या या ट्विटवरुन केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलंय. राहुल गांधींना विकास बघवत नाही. अमेठीत होत असलेल्या विकासाचा त्रास राहुल गांधींना होत असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. तसेच रविवारी मोदींनी कोरवा येथे JV चे उद्घाटन केले. त्यामुळे भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये एके 203 रायफलच्या निर्मित्तीला सुरूवात होणार आहे. राहुल गांधींना हे दिसत नाही का? असा प्रश्नही स्मृती इराणींनी विचारला आहे.
स्मृती इराणी यांनी 27 ऑगस्ट 2010 रोजीची एक बातमी शेअर करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. जर कोरवा येथे 2010 साली तुम्ही पायाभरणी केली होती, तर 2007 मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीसंदर्भात जे झालं त्यावरही आपण प्रकाश टाकावा असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राहुल गांधी मेड इन उज्जैन, मेड इन इंदूर, मेड इन जयपूर सांगत असतात. मात्र, आम्ही मेड इन अमेठीचं स्वप्न साकार केलं, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. मोदींनी रविवारी अमेठीत अत्याधुनिक क्लाशनिकोव-203 रायफल्सच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑर्डनान्स फॅक्टरीचं उद्घाटन केलं आहे. त्यावेळी, राहुल गांधींवर टीका केली होती.