नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेला कुख्यात आणि खतरनाक दहशतवादी कयूम नजरचा गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने खात्मा केला. विशेष म्हणजे, भारतीय जवानांना कयूमबाबतची संपूर्ण माहिती हिजबुल दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांनी दिली होती. हिजबुलच्या दहशतवाद्यांनीच जम्मू काश्मीर पोलिसांना सांगितले होते की, कयूम नजर पाकव्याप्त काश्मीरमधून काश्मीरमध्ये येणाच्या तयारी आहेत. एवढंच नाही तर नजरबाबत माहिती देणा-या दहशतवाद्यांनी असेही सांगितले की, नजर हा डोंगराळ भागातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि अशा पद्धतीनं हिजबुलनं कयूम नजरचा घात केला.
भारतीय लष्करानं मिळालेल्या या माहितीच्या आधारे नियंत्रण रेषेवर घुसखोरीदरम्यान या खतरनाक दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. दरम्यान, दहशतवाद्यांनी कयूम नजरच्या पतरण्याबाबतच्या कोणतीही माहिती दिली नव्हती तसेच तारीखही स्पष्ट केली नव्हती. मात्र, तो उत्तर काश्मीरच्या दिशेनं भारताच्या सीमेत दाखल होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या आधारे समोर आली होती. यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांना मिळालेली माहिती भारतीय लष्करापर्यंत पोहोचवली आणि यानंतर या परिसरात मोठा पहारा ठेवण्यात आला. नजरबाबत माहिती मिळाल्यानंतर सतर्क असलेल्या जवानांनी उरी सेक्टरमधून भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करणा-या नजरचा खात्मा केला, अशी माहिती समोर आली आहे.
लष्कराने असा केला दहशतवादी कयूम नजरचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये 27 सप्टेंबरला भारतीय लष्कराने खतरनाक दहशतवादी कयूम नजरचा खात्मा केला. लष्कर-ए-इस्लामचा प्रमुख अब्दुल कय्युम नजरला सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले. उरी सेक्टरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. सुरक्षा पथकांना मिळालेलं हे मोठं यश आहे. 50 पेक्षा जास्त हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. गेल्या 17 वर्षांपासून अब्दुल नजर काश्मीर खो-यात सक्रीय होता. उरीमधल्या लाचीपोरामधून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना सुरक्षा पथकांनी त्याला कंठस्नान घातले. नियंत्रण रेषेजवळ लाचीपोरा येथे जवानांनी त्याचा घुसखोरीचा कट उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला, अशी माहिती बारामुल्लाचे एसएसपी इम्तियाज हुसैन यांनी दिली. काश्मीरमधील टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे त्याच्याकडे लष्कर-ए-इस्लाम पुर्नजीवित करण्याची जबाबदारी दिली होती.
हिजबुल मुजाहिद्दीनमधून फुटून बाहेर पडलेल्या लष्कर-ए-इस्लामचे तो नेतृत्व करत होता. 43 वर्षीय अब्दुल नजर सोपोरचा राहणार होता. तो पाकिस्तानातही जाऊन आला होता. गावच्या सरपंचासह अनेक हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. वयाच्या 16 व्या वर्षापासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. काश्मीरमधल्या अनेक मोबाइल टॉवरवरील हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामुळेच त्याला मोबाइल टॉवर हे टोपण नाव देण्यात आले होते.