ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 2 - मध्यप्रदेशमधल्या खारगोन इथल्या कोर्टाने घयस्फोटासाठी आलेल्या एका प्रकरणामध्ये नवऱ्याने पत्नीला रोज हाय डार्लिंग कशी आहेस, असं विचारावं असा आदेश दिला आहे. पती आपल्याकडे पुरेसं लक्ष देत नाही अशी या महिलेची तक्रार होती. सहा महिन्यांपूर्वी मुलगा झाल्यानंतरही परिस्थिती न बदलल्याने पत्नीने घर सोडले आणि अखेर तिने घटस्फोटासाठी अर्ज केला.
न्यायालयासमोर हे प्रकरण आल्यानंतर मुख्य न्यायाधीश गंगाचरण दुबे यांनी ड्रायव्हर असलेल्या नवऱ्याला आदेश दिला की, रोज कामावरून घरी आल्यावर बायकोला विचारायचं, हाय डार्लिंग कशी आहेस तू? आजचा दिवस कसा गेला तुझा अशा तिच्याशी गप्पा मारायच्या असा सल्लाही या न्यायाधीशांनी दिला आहे.
घटस्फोटाची वेळ येऊ नये यासाठी कोर्ट प्रयत्नशील असतं, आणि शक्यतो टोकाची भूमिका घेतली जाऊ नये यासाठी सल्लाही दिला जातो. मात्र, न्यायाधीशांनी थेट आदेशामध्येच हाय डार्लिंग म्हणत बायकोची वास्तपुस्त करण्याचे आदेश दिल्यामुळे या निकालाची चांगलीच चर्चा होत आहे.