नवी दिल्ली – भारतात जी २० शिखर संमेलनासाठी जगातील २० प्रमुख देशांचे प्रतिनिधी आणि प्रमुख देशात येत आहेत. राजधानी दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. त्यात लग्झरी कारचाही समावेश आहे. दिल्लीत अचानक लग्झरी कारची मागणी वाढली आहे. ज्यात जर्मनीहून एक स्पेशल कार मागवण्यात आली आहे. या कारची किंमत साडे तीन कोटी इतकी आहे. जर्मनीतून आणलेल्या या कारला अनेक अत्याधुनिक फिचर्स आहेत.
पुनिया ट्रॅव्हल्सचे मालक हरमनजीत सिंग यांनी ही कार जर्मनीहून मागवली आहे. हरमन ट्रॅव्हल एजन्सीकडे ३०० हून अधिक लग्झरी कार आहेत. परंतु जी २० शिखर संमेलन पाहता हरमन यांनी जर्मनीतून साडे तीन कोटींची मेबॅक कार मागवली आहे. या कारसाठी जवळपास दीड वर्षाचा वेटिंग पिरीयड आहे. परंतु जी २० संमेलनासाठी ही लवकर पाठवण्यात आली. परदेशी पाहुण्यांचा आरामदायक प्रवास व्हावा यासाठी ही कार मागवल्याचे हरमन यांनी सांगितले. जी २० कार्यक्रमासाठी या कारचे भाडे प्रतिदिन १ लाख इतके असेल.
मेबॅक कारमध्ये काय फिचर्स आहेत?
जर्मनीतून मागवलेली ही कार भारतातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. त्यात सर्व हायटेक फिचर्स आहेत. या कारचे वैशिष्टे म्हणजे याचे दरवाजे हँड जेस्चरने उघडतात. कारमध्ये २० हून अधिक फ्रेग्रेंस आहेत. जेणेकरून कारमध्ये कुठलाही दुर्गंध येऊ नये. कारच्या मागील सीटवर मसाज होऊ शकतो. या कारचे सनरुफ सेंसर हँड जेस्चरने उघडते. बटणाच्या माध्यमातून मागील सीट रिक्लाइनरमध्ये रुपांतरीत होते. कारमध्ये बसणाऱ्या पाहुण्यांसाठी सर्वात महाग मिनिरल वॉटर ठेवले जाईल. कारमध्ये हायटेक स्पीकर आहेत. त्याशिवाय कारमध्ये असा एक टॅब आहे. ज्यातून कारमध्ये मागे बसलेला व्यक्ती संपूर्ण कारमध्ये कंट्रोल करू शकतो. ही कार ६ दिवसांसाठी सरकारने खासगी ट्रँव्हल कंपनीकडून भाड्याने घेतली आहे.
या गाड्यांची मागणी वाढली
दिल्लीत जी २० साठी महाग गाड्यांची मागणी वाढली आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी २० हून अधिक देशांचे सदस्य आणि ९ विशेष आमंत्रित देशांचे नेते दिल्लीत येत आहेत. या कार्यक्रमात १ हजाराहून अधिक लग्झरी कारची गरज लागणार आहे. त्यामुळे दिल्लीत लग्झरी कारच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यात मर्सिडिज एक्स क्लास, बीएमडब्ल्यू ७ सीरीज, मर्सिडिज ई क्लास, BMW 5 सीरीजसारख्या वाहनांचा समावेश आहे. सूत्रांनुसार, भारत सरकार कार्यक्रमात प्रत्येक दुतावासास एक मर्सिडिज एस, ई क्लास, टोयाटा कॅम्युटर, २ इनोव्हा क्रिस्टा आणि एक वॅन देण्यात येणार आहे.