नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. राफेल विमान करारातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआय संचालकांना रात्री दोन वाजता पदावरून हटवल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच राफेल करारातील भ्रष्टाचारासंबंधीचे महत्त्वपूर्ण पुरावे मोदींनी नष्ट केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी सांगितले की, सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती तीन जणांची समिती करते. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा या समितीमध्ये समावेश असतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयच्या संचालकांना रात्री दोन वाजता पदावरून हटवले. हा संविधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेत्यांचा अवमान आहे. तसेच हा भारतीय जनतेचाही अवमान असून, हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य आहे.
यावेळी एम. नागेश्वर राव यांच्या सीबीआयच्या हंगामी संचालकपदी करण्यात आलेल्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीबीआयकडून राफेल करारामधील पंतप्रधानांच्या भूमिकेची आणि कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पावले उचलण्यात येत होती. त्यामुळेच मोदींनी रात्री दोन वाजता सीबीआय संचालकांना पदावरून हटवले. जर राफेल कराराची चौकशी झाली तर सर्व सत्य समोर येईल. देशाला कळेल की, पंतप्रधानांनी भ्रष्टाचार करून अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवला आहे," असा आरोप राहुल गांधी यांनी केला.