नवी दिल्ली : देशभरात आज (मंगळवारी) साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अभूतपूर्व सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पठाणकोट हवाईतळावर झालेला हल्ला आणि त्यानंतर इसिस आणि अल-कायदासारख्या संघटनांचे नेटवर्क उधळून लावण्यासाठी सुरक्षा संस्थांनी चालविलेल्या धाडसत्राच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोनहल्ल्यांचा धोका पाहता दिल्लीलगतच्या राज्यांवरही नजर ठेवली जात आहे. राजपथाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.देशाच्या सर्व राज्यांत, विशेषत: सर्व महानगरांमध्येही हाय अलर्ट असून, सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे. विमानतळे, रेल्वे स्थानके तसेच गर्दीची सर्व ठिकाणे या ठिकाणी दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई विमानतळ २ फेब्रुवारी रोजी उडवून देण्याच्या धमकीमुळे तिथे कडेकोट बंदोबस्त आहे. शिवाय इसिसचे समर्थक आणि संशयित ज्या राज्यांतून पकडण्यात आले, तिथे विशेष अलर्ट आहे. इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपात देशभरात अटक करण्यात आलेल्या १२ संशयित दहशतवाद्यांना येथील विशेष न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठविले. (वृत्तसंस्था)पठाणकोटमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि सर्वच शासकीय इमारतींच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. प्रजासत्ताकाचा मुख्य कार्यक्रम असलेल्या काश्मीरच्या श्रीनगरमधील बक्षी स्टेडियमवर पोलिसांनी शक्तिप्रदर्शन करीत कडक बंदोबस्त ठेवला आहे.