पठाणकोट : भारताच्या वायुदलाचा तळ असलेल्या पठाणकोटच्या डिफेन्स रोडनजीक लष्करी गणवेश असलेली एक बेवारस गोण आढळून आल्याने पंजाब पोलीस आणि लष्कराने पठाणकोट व मामून छावणी परिसर पिंजून काढला. रविवारी एका स्थानिक व्यक्तीने एक बॅग आढळल्याची माहिती कळविल्यानंतर पठाणकोट शहर आणि मामून छावणी परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. गुरदासपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावरील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्र्रकार घडल्याने पोलीस आणि लष्कराने शिताफीने संयुक्त शोधमोहीम हाती घेतली आहे. या गोणीत लष्करी गणवेश आढळल्याने पठाणकोटमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.या बेवारस गव्हाच्या पिठाच्या गोणीत लष्करी गणवेषाचे पाच शर्ट्स आणि दोन विजारी आढळल्या. यामागील संशयित व्यक्तीला शोधण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे कसून शोध घेण्यात आला. २०१५मध्ये लष्करी गणवेशातील तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी एक कार पळवून गुरुदासपूर जिल्ह्यातील दीना नगर पोलीस ठाण्यावर भयंकर हल्ला करून पोलीस अधीक्षकांसह सात जणांना गोळ्या घालून ठार केले होते. मागच्या वर्षीही चार दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून शिरकाव करून पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर १ आणि २ जानेवारीच्या रात्री हल्ला केला होता. यात सात सुरक्षा जवान शहीद झाले होते. पठाणकोट हा अतिशय संवेदनशील तळ आहे. (वृत्तसंस्था)
पठाणकोटमध्ये हाय अलर्ट
By admin | Published: May 30, 2017 4:42 AM