"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 04:48 PM2024-09-27T16:48:01+5:302024-09-27T16:49:55+5:30
Bhupender Singh Hooda : एकीकडे भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे भूपेंद्र हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांच्या नावाचीही चर्चा आहे.
Haryana Assembly Elections 2024 : हरियाणातील विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल, तसं राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. यातच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा (Bhupender Singh Hooda) यांनी पुनरुच्चार केला की, मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडने घ्यायचा आहे आणि तो मला मान्य असेल. परंतु त्यांनी असेही म्हटले की, मी निवृत्त झालो नाही किंवा थकलेलो नाही.
काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढत आहे. तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा असून कुमारी सैलजा काही काळ निवडणूक प्रचारापासून दूर राहिल्या आहेत. भूपेंद्र हुड्डा यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भूपेंद्र हुड्डा म्हणाले की, हरियाणात काँग्रेस एकसंध आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एकापेक्षा जास्त दावेदार आल्याने पक्षाला अधिक बळ मिळणार आहे. राज्यात काँग्रेसला मोठा जनादेश मिळेल. 'अबकी बार कांग्रेस की सरकार' हे जनतेने ठरवले आहे.
एकीकडे भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे भूपेंद्र हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे दीपेंद्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे का? असा सवाल भूपेंद्र हुड्डा यांना करण्यात आला. त्यावेळी म्हणाले की, ना मी निवृत्त झालो आहे ना थकलो आहे. तसेच, हुड्डा यांनीही मतं कापण्याची शक्यता नाकारली. काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत असल्यामुळे जनता मतं कापणाऱ्यांकडे जाणार नाही, असे ते म्हणाले.
भूपेंद्र हुड्डा आज (२७ सप्टेंबर) कर्नालमधील उंद्री येथून रॅली काढत आहेत. भूपेंद्र हुड्डा हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील गढ़ी सांपला किलोई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पूर्वी जागेला किलोई म्हणून ओळखले जात होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सीमांकन झाल्यानंतर या जागेला गढी सांपला किलोई असे संबोधले जाऊ लागले. भूपेंद्र हुड्डा यांनी २००० मध्ये पहिल्यांदा या जागेवर निवडणूक जिंकली होती. या जागेवरून सातत्याने निवडून येत आहेत.