बिलासपूर - छत्तीसगढच्या बिलासपूर उच्च न्यायालयाने तलाकप्रकरणातील याचिकेवर सुनावणी करताना महत्त्वाची टिपण्णी केली आहे. पती-पत्नी यांच्या संबंधात चांगल्या वैवाहिक जीवनासाठी शारीरीक संबंध ठेवणे गरजेचे आहे. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने हे गंभीर मत नोंदवले, तसेच तलाक याचिका स्वीकारही केली. लग्नानंतर पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोणीही शारिरीक संबंधास नकार देणे ही क्रुरता असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
बिलासपूरच्या एका युवकाचे लग्न बेमेतरा येथील महिलेसोबत झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्याची पत्नी सासरहून माहेरी गेली. त्यानंतर, ती तेथेच थांबली. लग्नानंतर 4 वर्षात सातत्याने प्रत्येक सणाला ती माहेर जात होती, तेथेच राहत होती. त्यामुळे, पतीने 25 नोव्हेंबर 2017 रोजी पत्नीपासून घटस्फोटाची मागणी केली. त्यामध्ये, लग्नानंतर काही दिवसांतच पत्नीचा व्यवहार हा क्रुरता असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं. महिला तिचं शरीर जास्त वजनाचं असून मी सुंदर नसल्याचे सांगत शारीरीक संबंधास नकार देत होती. तसेच, महिला वडिलांच्या निधनानंतर आपल्या माहेर निघून गेली, ती तेथेच राहत होती, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
याप्रकरणी संबंधित महिला 4 वर्षांपासून आपल्या माहेरीच राहत आहे. याचिकाकर्त्याने सातत्याने महिलेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच, तिला घरी परत येण्याचेही सूचवले. मात्र, तिनेच पतीला बेमेतरा येथील माहेरी येण्याचे सूचवले. तसेच, पतीला न सांगता पत्नीने नोकरीही करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे लग्न जमवतेवेळी हे ठरले होते की, पत्नीला नोकरी करता येणार नाही.
दरम्यान, याप्रकरणी न्यायाधीस पी. सैम कोशी आणि पार्थ प्रतिम साहू यांच्या खंडपीठाने म्हटले की, ऑगस्ट 2010 पासून पती-पत्नीच्या रुपाने दोघांमध्ये कुठलेही संबध राहिल्याचे दिसत नाही. त्यातून, त्यांच्यात कुठलेही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नसल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. पती आणि पत्नी यांच्यात सुखी वैवाहिक जीवनासाठी शारीरिक संबंध प्रस्थापित होणे महत्त्वाचं आहे. पती किंवा पत्नी यांपैकी एकानेही शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. म्हणून, याप्रकरणी पत्नीने पतीसोबत क्रुरता केल्याचंही न्यायालयाने म्हटले आहे.