High Court: "पत्नीने गुटखा खाल्ला, दारू प्यायली आणि मांस खाल्ले तर...", उच्च न्यायालयाचा अनोखा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:43 PM2022-12-28T12:43:07+5:302022-12-28T12:45:27+5:30
पती पत्नीच्या वादावर छत्तीसगडच्या बिलासपूर उच्च न्यायालयाने एक अनोखा निर्णय दिला आहे.
नवी दिल्ली : छत्तीसगडच्या बिलासपूर उच्च न्यायालयानेघटस्फोटासंदर्भातील आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर एखादी पत्नी पुरुषांप्रमाणेच पान, गुटखा आणि दारूसह मांस खाऊन पतीचा छळ करत असेल तर ती देखील क्रूरताच आहे. बिलासपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या दुहेरी खंडपीठाने या कारणास्तव पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार असल्याचे घोषित केले आहे.
दरम्यान, कोरबा जिल्ह्यातील बांकीमोंगरा येथील तरुणाने कटघोरा येथील तरुणीशी लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या सात दिवसांनी 26 मे 2015 रोजी सकाळी संबंधित तरूणाची पत्नी बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. पतीने तिला उपचारासाठी नेले असता तिला दारू पिण्यासोबतच मांसाहार आणि गुटख्याचे व्यसन असल्याचे आढळून आले. याबाबत नातेवाईकांनी तिला समजावले मात्र, पत्नीने सासरच्यांशी गैरवर्तन करणे सुरूच ठेवले.
पतीने उच्च न्यायालयात घेतली धाव
गुटखा खाल्ल्यानंतर ती महिला बेडरूममध्ये कुठेही थुंकायची आणि नकार दिल्यावर पतीसोबत भांडण करायची, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या महिलेने 30 डिसेंबर 2015 रोजी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. एवढेच नाही तर दोन वेळा छतावरून उडी मारून आणि नंतर दोनदा कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्नीच्या व्यापामुळे त्रस्त झालेल्या पतीने घटस्फोटासाठी कोरबा येथील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र, कौटुंबिक न्यायालयाने ही आपली गोपनीयता असल्याचे सांगत पतीची याचिका फेटाळून लावली.
उच्च न्यायालयाचा अनोखा निर्णय
लक्षणीय बाब म्हणजे या निर्णयाविरोधात पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द ठरवत पतीचे घटस्फोटासाठी केलेले अपील मान्य करून पत्नीकडून होणारा छळ ही क्रूरता असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"