Arvind Kejriwal Arrest: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. केजरीवालांनी त्यांच्या अटकेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली. न्यायालयाने म्हटले की, ईडीने या प्रकरणात काही पुरावे गोळा केले असतील, त्यामुळे ईडीचे म्हणणे ऐकल्याशिवाय आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे. सकाळी सीएम केजरीवाल आणि ईडीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.
दिल्ली उच्च न्यायालयानेअरविंद केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. यासोबतच ईडीलाही केजरीवाल यांच्या याचिकेवर 2 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. सविस्तर सुनावणी झाल्याशिवाय आदेश देता येणार नाहीत, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ एप्रिल रोजी होणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन त्यांची अटक बेकायदेशीर असून, त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या बाजूने वकील अभिषेक मनू सिंघवी, तर ईडीच्या बाजूने वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी युक्तिवाद केला. दुपारी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आता न्यायालयाने आपला निर्णय देत केजरीवांना धक्का दिला.
केजरीवाल 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत दिल्लीतील कथित अबकारी धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ईडीने 21 मार्चला सलग 9 समन्स पाठवल्यानंतर केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली होती. 21 मार्चच्या संध्याकाळी ईडीचे पथक 10व्या समन्ससह केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. घराची झडती घेतल्यानंतर टीमने केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक केली आणि त्यांना ईडीच्या मुख्यालयात नेले. यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 22 मार्चला ईडीने मुख्यमंत्र्यांना राऊस एव्हेन्यू येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने केजरीवालांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.