लखनऊ: देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. १ मे रोजी देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. मात्र आज पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला. देशाच्या अनेक राज्यांमधील परिस्थिती भीषण होत चालली आहे. वैद्यकीय यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. उत्तर प्रदेश सरकार मोठमोठे दावे करण्यात व्यग्र असताना दुसरीकडे सर्वसामान्यांपासून विशेष व्यक्तींनादेखील मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना व्हिव्हिआयपी रुग्णालयात बेड न मिळाल्याचा प्रकार घडला. वेळेत योग्य उपचार न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. न्यायाधीश व्ही. के. श्रीवास्तव यांचं एप्रिलमध्ये निधन झालं. २३ एप्रिलला त्यांना लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना कोणत्याही वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाहीत. लखनऊमध्ये व्हिव्हिआयपी रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय आहे. मात्र तिथे श्रीवास्तव यांना बेड मिळाला नाही.अलाहाबाद उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती व्ही. के. श्रीवास्तव यांच्या निधनाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. श्रीवास्तव यांना आरएमएल रुग्णालयात सुविधा मिळाल्या नाहीत. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पीजीआयमध्ये हलवण्यात आलं. तिथेच त्यांचं निधन झालं, असं न्यायालयानं म्हटलं. या प्रकरणी न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला उत्तर देण्यास सांगितलं आहे. मात्र अद्याप तरी सरकारनं न्यायालयाला कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
CoronaVirus News: हायकोर्टाच्या कोरोनाबाधित न्यायमूर्तींना वेळेत उपचार नाहीत; VVIP रुग्णालयातही बेड न मिळाल्यानं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 4:23 PM