लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालकांनी सोडलेल्या एका वर्षाच्या अफगाणी मुलाला दत्तक देण्याकरिता भारतीय पासपोर्ट देण्यासाठी पुणे येथील दत्तक एजन्सीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस बजावली.
एक वर्षाच्या अफगाणी मुलाला भारतीय पासपोर्ट देण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका पुण्याच्या भारतीय समाज सेवा केंद्र या दत्तक एजन्सीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्या. गौतम पटेल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. याचिकेनुसार, एक दिवसाच्या असलेल्या ॲटलसला त्याच्या पालकांनी दत्तक एजन्सीकडे ९ सप्टेंबर २०२१ रोजी ताब्यात दिले. आता तो एक वर्षाचा आहे. त्याचा जन्म भारतात झाल्याने तो भारतीय नागरिकत्व मिळविण्यास पात्र आहे. ॲटलसला दत्तक देण्यासाठी अद्याप प्रक्रिया सुरू केलेली नाही. मात्र, प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्याच्या नागरिकत्वाचे कागदपत्र नसल्याने अडथळा येऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले.
उच्च न्यायालय म्हणाले...पासपोर्ट नसल्याने मुलाला दत्तक देण्याच्या प्रक्रियेत अडथळा आलेला नाही, असे केंद्र सरकारने नमूद केल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले. केंद्र सरकारचे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या योग्य असू शकते. मात्र, भविष्यात अडथळा येऊ शकतो, या भीतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲटलस दत्तक घेण्यास योग्य असल्याचे जाहीर केले तरी दत्तक घेणारे पालक सापडणार नाहीत. कारण त्याच्याकडे पासपोर्ट नसेल, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले.