Rajkot Game Zone Fire : गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनमधल्या अग्नितांडवात २८ जणांचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र आता या गेमिंग झोनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपायोजना करण्यात आल्या नव्हत्या आणि तो तसाच गेली दोन वर्षे सुरु होता. या प्रकरणाची आता सुप्रीम कोर्टाने दखल घेतली असून कठोर पावले उलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तुम्ही आंधळे आहात का? इतके दिवस झोपला होतात का? अशा शब्दात गुजरात हायकोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं आहे.
राजकोटमधील टीआरपी गेमिंग झोनमध्ये मोठ्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने सोमवारी राजकोट महानगरपालिकेला चांगलेच धारेवर धरलं. टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या मोठ्या आगीत नऊ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेमिंग झोनमधल्या भीषण आगीची गुजरात उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. न्यायालयाने याला मानवनिर्मित आपत्ती म्हटलं.
गेल्या दोन वर्षांपासून राजकोटमधील दोन गेमिंग झोन आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी राज्य सरकारला फटकारले. 'तुम्ही काय आंधळे झाला आहात का? तु्म्ही काय झोपला आहात का? अशा शब्दात कोर्टाने सरकारला सुनावलं. तसेच आता आमचा स्थानिक यंत्रणा आणि राज्य सरकारवर विश्वास नाही, असेही खडेबोल कोर्टाने सुनावले.
न्यायमूर्ती बिरेन वैष्णव आणि न्यायमूर्ती देवन देसाई यांच्या विशेष खंडपीठाने न्यायालयाच्या आदेशानंतरही अशी दुर्घटना कशी घडू शकते, असा सवाल करत राज्य सरकारव अविश्वास व्यक्त केला. गेमिंग झोन चालवणाऱ्यांनी राजकोट महानगरपालिकेकडून आवश्यक परवानग्या आणि परवाने घेतले नव्हते. राजकोट महापालिकेने यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर कोर्टाने संताप व्यक्त केला.
राजकोट महापालिकेने कोर्टात सांगितले की, गेमिंग झोनसाठी आमची मान्यता घेण्यात आलेली नव्हती. त्यावर कोर्टाने, "हा (टीआरपी गेमिंग झोन) अडीच वर्षांपासून सुरू आहे. तुम्ही डोळे मिटलेत असे आम्ही समजावे का?' राज्य सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही," असं म्हटलं आहे.
दरम्यान, या खळबळजनक घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या विभागातील एकूण सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच गेमिंग झोनमधून सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. वेल्डिंग दरम्यान आग लागल्याने हा भीषण अपघात झाल्याचे म्हटलं जात आहे.