सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यशैलीत वेगाने बदल घडवण्याचा संकल्प केल्याचे जाणवते आहे. दिल्लीत कॉर्पोरेट शैलीचे आधुनिक मुख्यालय उभारण्याबरोबरच देशातल्या ५२५ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्वत:च्या मालकीची कार्यालये उभी करण्याचा संकल्पही भाजपने केला आहे. या कार्यालयांच्या उभारणीसाठी देशात २00 ठिकाणी भाजपने स्वत:च्या मालकीची जमीन खरेदी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते रक्षाबंधनाच्या शुभदिनी कॅनॉट प्लेसजवळील दिल्लीच्या दिनदयाल उपाध्याय मार्गावर भाजपच्या नव्या मुख्यालयाचे विधीवत भूमिपूजन झाले. येत्या २ वर्षांत आधुनिक सुविधांनी युक्त ७0 दालनांचे हे कॉर्पोरेट स्टाईल मुख्यालय बांधून तयार होईल. या वास्तूत ७0 खोल्यांसह परिचर्चा सभागृह, संमेलन सभागृह, ग्रंथालय, वाचन व संशोधनासाठी स्वतंत्र हॉल, स्क्रीनिंग रूम, प्रवक्त्यांच्या बाईटस व परिचर्चेतील सहभागासाठी वेगळा स्टुडिओ, उत्तम दर्जाचे कँटीन सर्वत्र व्हाय फाय सुविधा,आदी सोयी उपलब्ध असतील.सध्याचा कालखंड भाजपच्या दृष्टिने सुवर्णकाळ आहे. देशात ११ कोटी सदस्य नोंदवल्याचा दावा भाजप करीत असला तरी या संख्येचे आॅडिट कोणीही केले नसल्याने हा दावा तसा वादग्रस्तच आहे. दोन वर्षात पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांची चहल पहल या ५२५ कार्यालयांमधे दिसावी, मंडल स्तरावरील प्रत्येक कार्यक र्त्याचे डॉक्युमेंटेशन व्हावे, असा अध्यक्षांचा प्रयत्न आहे. आर्काईव्हसाठी पक्षाशी संबंधित पूर्वीच्या सर्व बऱ्या वाईट घटनांची माहिती गोळा करण्याचे कामही एकीकडे सुरू आहे. >हवेचा भरवसा नाही...अडवाणींच्या कारकिर्दीपासून पक्ष ‘पार्टी वुइथ डिफरन्स’ चे बिरूद मिरवतो आहे. माध्यमे व विरोधकांनी अनेकदा या उक्तीची चेष्टा केली. तथापि सद्यस्थितीत राजकीय हवेच्या भरवशावर चालणारे राजकारण तंत्र, मोदी आणि शाह मात्र बदलू इच्छितात. २0१४ साली लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या देदिप्यमान यशाच्या नशेतूनही पक्ष कार्यक र्त्यांना ते बाहेर काढू इच्छितात. राजकीय सत्तेचा कालखंड आराम करण्यास नसून अधिक वेगाने पक्षउभारणीस मेहनत करण्याचा आहे, ही बाब दोघेही पक्ष कार्यक र्त्यांवर ठसवू इच्छितात.