अरविंद केजरीवालांच्या पक्षाने पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारली आणि सत्ता स्थापन केली आहे. परंतू आज एक विचित्र प्रकार घडला आहे, ज्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे निवडणुकीआधी मान हे नावाचे मुख्यमंत्री असतील, केजरीवालच सरकार चालवतील, अशा विरोधकांच्या आरोपांना बळ मिळत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीला आले होते. त्याचवेळी पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलविण्यात आली होती. हे अधिकारी दिल्लीत आले होते. तेव्हा केजरीवाल तिथे असल्याने त्यांनीच ती घेतली आणि गोंधळ उडाला. केजरीवाल हे पक्षाचे प्रमुख आहेत परंतू पंजाबचे नाहीत. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी केजरीवालाचा काय संबंध, ते पंजाबचे मुख्यमंत्री आहेत का, असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी तर हे वादळ आता एकेक मुखवटे फाडणार आहे. हा पंजाबचा अपमान आहे. संघराज्याचे स्पष्ट उल्लंघन असून आता रिमोट कंट्रोल दिल्लीत असल्याचे दिसले आहे, असा आरोप केला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, वाईट घडणार याची भीती होती. अरविंद केजरीवाल यांनी अपेक्षेपेक्षा आधीच पंजाब काबीज केला आहे. भगवंत मान हा रबर स्टॅम्प आहे, जे आम्ही आधीच म्हणालो होतो, अशी टीका केली आहे. केजरीवाल यांचे हे बैठक घेणे पंजाबी लोकांनाही आवडलेले नाही. काहींनी तशा प्रतिक्रिया देखील ट्विटवर पोस्ट केल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत, मग पंजाबचे मुख्यमंत्री खुर्चीवर का बसले आहेत? असा सवाल एका युजरने केला आहे.
कशासाठी बैठक...केजरीवाल यांनी या अधिकाऱ्यांना पंजाबमध्ये ३०० युनिट वीज मोफत देण्याविषयी चर्चा करण्यासाठी बोलविल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला त्यांनी उर्जा मंत्र्यांनाही बोलावले नाही. मान यावर आज दुपारनंतर केजरीवाल यांच्याशी चर्चा करतील. यानंतर मोफत वीज देण्याचा निर्णय होईल असे सांगितले जात आहे.