बिहारच्या समस्तीपूरमध्ये शिक्षण थांबवल्यामुळे आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे संतापलेल्या पत्नीने फूटओव्हर ब्रिजवर उभं राहून गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. तिची शाळेची सर्टिफिकेट परत करावी, असे ती तिच्या पतीला वारंवार सांगत होती. मात्र पती तिच्या सर्टिफिकेटची फाईल देत नव्हता. दोघांमध्ये एवढा वाद झाला की पतीने पत्नीला बेदम मारहाण केली.
पती-पत्नीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहून इतर लोकही तेथे जमा झाले. ती रेवाडी येथील रहिवासी असल्याचे मुलीने सांगितले. दोन महिन्यांपूर्वी तिचे ताजपूर ब्लॉकमधील चंदौली हाट येथे लग्न झाले. लग्न झाल्यापासून सासरचे लोक तिचा हुंड्यासाठी छळ करत आहेत. ते तिच्याकडे 9 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत आहेत. यासोबतच पतीने तिचे सर्टिफिकेटही सोबत ठेवले आहेत.
ही घटना शनिवारी सायंकाळची आहे. पीडितेने सांगितले की, तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. लग्नापूर्वी ती कॉम्प्युटर कोर्स करत होती जो पूर्ण झाला नव्हता. मात्र लग्नानंतर नवऱ्याने तिला कॉम्प्युटर क्लासला जाण्यापासूनही रोखलं. तो तिला तिथे जाऊ देत नव्हता. रविवारीही यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. पतीने तिच्याकडून सर्टिफिकेटची फाईल घेतली आणि घराबाहेर काढलं. हे पाहून पत्नीही त्याच्या मागे गेली.
पतीने पत्नीला केली मारहाण
पत्नी पतीकडे सर्टिफिकेटची फाईल पुन्हा पुन्हा मागत राहिली. पण पतीने ती फाईल तिला दिली नाही. दोघे पायी चालत फूटओव्हर ब्रिजजवळ पोहोचले तेव्हा पत्नीने तेथे गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तिने पतीला सांगितले की जर त्याने आपली फाईल दिली नाही तर ती पुलावरून उडी मारेल. यावर पतीने तिला मारहाण केली.
आजोबांसह घरी परतली
पती-पत्नीच्या भांडणासाठी तेथे अनेक लोक जमा झाले. मुलीच्या आजोबांनाही माहिती देण्यात आली. लोकांनी मुलीच्या पतीकडून सर्टिफिकेटची फाईल घेऊन तिला परत केली तेव्हा ती शांत झाली. यानंतर मुलीने सासरच्या घरी जाणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीचे आजोबा तिला आपल्यासोबत घरी घेऊन गेले. त्याचवेळी कोणीतरी पोलिसांनाही या भांडणाची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस तेथे पोहोचताच पतीने घटनास्थळावरून पळ काढला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.