ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या आरोपींना मोदी सरकारने भारतरत्न व व पद्मविभूषण पुरस्कार दिला असे वादग्रस्त विधान असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. अशा सरकारकडून बाबरी मस्जिद प्रकरणात न्याय मिळेल अशी आशा राहिलेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
हैदराबाद येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. बाबरी मस्जिद प्रकरणात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका संशयास्पद होती. मस्जिद पाडण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेले भाषण यूट्यूबवरही सहज उपलब्ध आहे. मात्र अशाच व्यक्तींना मोदी सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला आहे याकडे ओवेसींनी लक्ष वेधले. रथयात्रेच्या माध्यमातून देशभरात नुकसान व अशांतता पसरवणा-या लालकृष्ण अडवाणींना मोदी सरकार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करत आहेत. त्यांच्यावर आजही अनेक गुन्हे दाखल आहे. ऐवढे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल असेही त्यांनी नमूद केले. ओवेसींनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच टीका केल्याने आता भाजपाकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.