ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारतातील विविध समाजांमध्ये मुस्लिम समाजात निरक्षरांची संख्या सर्वात जास्त असून, जैन समाज देशातील सर्वाधिक सुशिक्षित समाज असल्याची माहिती २०११ च्या जनगणनेतून समोर आली आहे. मुस्लिमांच्या १७.२२ कोटी लोकसंख्येपैकी ७.३५ कोटी लोक निरक्षर आहेत. यातील २.८२ कोटी सहावर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत.
९६.६ कोटी हिंदूंपैकी ३५.१६ कोटी हिंदू निरक्षर आहेत. ख्रिश्चनांच्या २.७८ कोटी संख्येपैकी ७१.३७ लाख निरक्षर आहेत. जैन समाजामध्ये निरक्षरांची संख्या सर्वात कमी आहे. जैन समाजाची एकूण संख्या ४४.५१ लाख असून, त्यापैकी ६.०४ लाख निरक्षर आहेत. जैनांमध्येच सर्वाधिक ११.४२ लाख ग्रॅज्युएट आहेत.
ग्रॅज्युएशन किंवा त्यापुढे फक्त २.७६ टक्के मुस्लिम शिक्षण घेतात. ०.४४ टक्के तंत्रज्ञान किंवा अन्य डिप्लोमाची पदवी घेतात. ६.३३ टक्के मुस्लिम एसएससीपर्यंत शिकतात. सहावर्षांच्या पुढे १२.७५ कोटी हिंदू निरक्षर आहेत. ५.७७ कोटी हिंदू ग्रॅज्युएट आहेत. अन्य समाजांमध्ये ४७.५२ लाख मुस्लिम, २४.६१ लाख ख्रिश्चन, १३.३३ लाख शिख ग्रॅज्युएट आहेत. यात दिलासा देणारी बाब म्हणजे २००१ पासून सर्व समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे.