नवी दिल्ली - देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे. तेथील कमाल तापमान 45 अंशांवर दाखल झाले आहे. राजधानी दिल्लीही तापली असून, कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. देशात एक असं शहर आहे जिथे तब्बल 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे; हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण आहे.
राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी शुक्रवारी (31 मे) 49.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने देशातील सर्वात तप्त दिवस या ठिकाणी नोंदवला गेला असल्याची माहिती दिली आहे. श्री गंगानगर येथे याआधी 30 मे 1944 मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी 49.4 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर आता तब्बल 75 वर्षांनी पुन्हा एकदा राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
बीकानेरमध्ये 46.6 अंश सेल्सिअस, जैसलमेरमध्ये 46.5 अंश सेल्सिअस, जोधपूर 44.7 अंश सेल्सिअस, कोटा 44.6 अंश सेल्सिअस, अजमेर 44.5 अंश सेल्सिअस, बाडमेर 44.5 अंश सेल्सिअस, जयपूर 44.2 अंश सेल्सिअस आणि उदयपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमान वाढल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाचे दिवस नोंदवले गेले आहेत.
आणखी तीन दिवस राहणार ‘ताप’दायक वातावरण
राज्यातील तापमानातही वाढ झाली आहे. विदर्भात अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या हवामानात काहीच बदल नोंदविण्यात येणार नसल्याची चिन्हे आहेत. परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील हवामान तापदायकच राहणार असून, 2 जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. चंद्रपूरचे गुरुवारचे कमाल तापमान 46.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, हे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान आहे. मुंबईचे कमाल तापमान 34.3 अंश नोंदविण्यात आले असून, ‘ताप’दायक ऊन आणि आर्द्रता मुंबईकरांना घाम फोडत आहे. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये कमीत कमी एक आठवडाभर तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील. नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर आणि मालेगाव येथे कमाल तापमान अधिक राहील. येथे किमान तापमानही 30 अंश राहील.