नवी दिल्ली : सन २०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे तब्बल २३ हजारांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गतवर्षातील एकूण तक्रारींपैकी एक चतुर्थांश तक्रारी घरगुती हिंसाचाराशी संबंधित होत्या, असे दिसून आल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले.
आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षी म्हणजेच सन २०२० मध्ये तब्बल २३ हजार ७२२ तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षातील हा सर्वाधिक आकडा असल्याचे समजते. देशभरातून आलेल्या एकूण तक्रारींपैकी उत्तर प्रदेशातून ११ हजार ८७२, दिल्लीतून २ हजार ६३५, हरियाणा १ हजार २६६, महाराष्ट्र १ हजार २८८ तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. तसेच एकूण तक्रारींपैकी ७ हजार ७०८ तक्रारी या सन्मानाने जगण्याचा अधिकार यासंबंधित आहेत.अनेक प्रकरणात महिलांच्या भावनांची कदर केलेली दिसत नाही, असेही आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडे आलेल्या तक्रारींकपैकी ५ हजार २९४ तक्रारी या घरगुती हिंसाचाराच्या आहेत. आर्थिक असुरक्षितता, ताणात पडलेली भर, आर्थिक चिंता, नैराश्य, भावनिक आधार न मिळणे, आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित मदत न मिळणे यांसारखी कारण यामागे असल्याचे शर्मा यांनी सांगितले. सन २०२० मध्ये सहा वर्षांतील सर्वाधिक तक्रारी आल्या असून, यापूर्वी सन २०१४ मध्ये ३३ हजार ९०६ तक्रारी आल्या होत्या.
लॉकडाऊनमध्ये तक्रारींमध्ये वाढ
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये तक्रारींमध्ये वाढ झाली. मार्चनंतर घरगुती हिंसाचाराबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, जुलै महिन्यात सर्वाधिक ६६० तक्रारींची नोंद करण्यात आली. हुंड्यासाठी छळवणुकीच्या ३ हजार ७८४ आणि विनयभंगाच्या १ हजार ६७९ तक्रारी आल्या आहेत. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या १ हजार २७६ तक्रारी आल्या असून, ७०४ तक्रारी या सायबर गुन्ह्यांबाबतच्या आहेत.