श्रीनगर : दुर्गम सीमाभागांमध्ये रस्तेबांधणी करणा-या ‘बॉर्डर रोड््स आॅर्गनायजेशन’ या लष्कराच्या अखत्यारीतील संघटनेने जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात चीनच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर, मोटारवाहने जाऊ शकतील, असा जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधण्याची कामगिरी फत्ते केली आहे. हिमालय पर्वतराजींतील उमलिंगला शिखरावरून पार जाणाराहा रस्ता समुद्रसपाटीपासून १९,३०० फूट उंचीवर आहे.‘बीआरओ’ने ‘हिमांक योजने’खाली या रस्त्याचे बांधकाम केले. हान्लेच्या जवळून जाणारा हा ८६ किमीचा रस्ता चिसमुले आणि डेमचॉक या लेहपासून २३० किमीवर असलेल्या दोन गावांना जोडतो. ही गावे चीनच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत. या रस्त्याचे अत्यंत कठीण व आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण केल्याबद्दल ‘बीआरओ’च्या ‘हिमांक योजने’चे प्रमुख ब्रिगेडियर पुर्विमथ यांनी सहकाºयांचे कौतुक केले. ते म्हणाले की, एवढ्या उंचीवर काम करणे प्राणघातक होते. पण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता बहाद्दर कर्मचाºयांनी व यंत्रांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले. (वृत्तसंस्था)
चीनच्या सीमेलगत लष्कराच्या संस्थेने बांधला सर्वात उंच रस्ता, आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 7:11 AM