अयोध्या - 2005 मध्ये अयोध्येत दहशतवादी हल्ला होता या हल्ल्यातील आरोपींना 18 जून रोजी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. मात्र या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत घातपात होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे अयोध्येत हायअलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा जागता पहारा असणार आहे.
गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार नेपाळमार्गे काही दहशतवादी भारतात घुसले असून अयोध्येला ते निशाणा बनविण्याची शक्यता आहे. अयोध्येतील प्रमुख ठिकाणे, हॉटेल, धर्मशाळा या सर्व परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या ट्रेन्स, बसेसची तपासणी केली जात आहे. 5 जून 2005 रोजी अयोध्येत हल्ला करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. तसेच या हल्ल्याचं षडयंत्र रचणाऱ्या 4 दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली होती. याच दहशतवाद्यांवर 18 जून रोजी सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या 18 खासदारांसह अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरेंना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता ते अयोध्येत दाखल होतील त्यानंतर 10 वाजता ते रामलल्लाचे दर्शन घेतील अशी माहिती अयोध्या दौऱ्याचे संयोजक खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जागोजागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिग्ज आणि फलक लावण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युती केली. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठं यशही मिळालं आहे. त्यामध्ये शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला आहे.