नवी दिल्ली- भारतामध्ये 61,164 किमी महामार्ग बांधणीची कामे सुरु असून त्या प्रकल्पांची किंमच 6 लाख 45 हजार कोटी असल्याची माहिती सरकारने आज संसदेत दिली.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्यसभेत लेखी दिलेल्या उत्तरामध्ये 6.45 लाख कोटी रुपयांचे महामार्गांचे बांधकाम देशात सुरु असल्याचे नमूद केले आहे. हे सर्व मार्ग 1,873 प्रकल्पांच्या अंतर्गत पूर्ण होत आहेत असेही त्यात नमूद केले आहे. 2019 च्या मार्च महिन्यापर्यंत 295 मोठे प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा 71 टक्के अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकारने रस्ते बांधणीच्या क्षेत्रात केलेल्या वेगवान प्रगतीचे कौतुक केले जात आहे. या सरकारने पहिल्या चार वर्षांमध्येच 28,531 किमी राष्ट्रीय महामार्गांची बांधणी केली आहे तर संपुआ सरकारच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये 16,505 किमी इतक्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते.
रालोआ सरकारने रस्तेबांधणी क्षेत्राला विशेष महत्त्व दिल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. 2017-18 या वर्षी राष्ट्रीय महामार्गांची सर्वात जास्त निर्मिती झाली. या वर्षभरात 9 हजार 829 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले तर 2016-17 या वर्षभरात 8 हजार 231 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले.2015-16 या वर्षी 6 हजार 61 किमी लांबीचे तर 2014-15 या वर्षी 4 हजार 410 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले होते. 2010-11 या वर्षी 4,500 किमीचे तर 2011-12 या वर्षभरात केवळ 2,013 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले गेले. 2012-13 या वर्षी 5,732किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले होते.