भोपाळ - कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटत आहेत. अनेक सत्ताधारी आणि विरोधी नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही याच हिजाब वादावर मोठे वक्तव्य केले होते. 'इंशा अल्लाह, एक दिवस हिजाबी पंतप्रधान बनेल,' असे ट्विट ओवेसींनी केले होते. त्यानंतर, देशभरातून अनेक प्रतिक्रिया आल्या. आता, खासदार प्रज्ञा ठाकूर यांनीही हिजाब वादावर आपलं मत नोंदवल असून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कर्नाटकानंतर मध्य प्रदेशातही हिबाज वादावरील घटना थांबायचं नाव घेत नाहीत. भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी हिजाब वादावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणालाही हिजाब परिधान करण्याची आवश्यकता नाही. महिलांनी घरातच हिजाब घालावा, विशेष समाजात मुली-बहिणींवर वाईट नजर ठेवली जाते. तेथे स्त्रियांचा सन्मान केला जात नाही. या विशेष समुदायात आपल्याच घरातील बहिण आणि घरातच लग्न केले जातात. त्यामुळेच त्यांना घरातच हिजाब घालण्याची गरज आहे, असे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले.
हिजाब केवळ मदरशापर्यंतच मर्यादीत ठेवला पाहिजे. विद्यालय-महाविद्यालयांचे निमय मोडल्यास ते सहन केले जाणार नाही. दरम्यान, यापूर्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मस्जिदमधून होणाऱ्या नमाज पठणच्या अजानवरही आक्षेप घेतला होता. सकाळी सकाळी लोकांची झोपमोड करण्याचं काम या अजानमुळे होते, साधु-संतांची साधना भंग होते, असेही ठाकूर यांनी म्हटले होते.
हिजाब वादावर काय म्हणाले होते औवेसी
व्हिडिओमध्ये ओवेसी म्हणतात की, 'आमच्या मुलींना शुभेच्छा देतो. मुलींना हिजाब घालायचा असेल, तर त्यांना कुणी अडवू शकत नाही. आम्ही पाहतो त्यांना कोण अडवतं. हिजाब, नकाब घालणार आणि कॉलेजमध्येही जाणार. हिजाब घालून कलेक्टर बनणार, बिजनेस वूमन, एसडीएम आणि एक दिवस हिजाब घालणारी तरुणीच या देशाची पंतप्रधानदेखील बनेल.'