नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) कर्नाटकच्या हिजाब प्रकरणी (Hijab Controvercy ) सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू असून आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. सर्वोच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, कर्नाटकात काय होतंय ते पाहत आहोत? सुप्रीम कोर्टाने वकिलांना सांगितले की, हा राष्ट्रीय स्तराचा मुद्दा बनवू नका आणि योग्य वेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल.
हा मुद्दा धार्मिक आणि राजकीय बनवू नका
कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम आदेश जारी केला होता की पुढील आदेश येईपर्यंत शाळा पुन्हा सुरू कराव्यात आणि तोपर्यंत शाळांमध्ये धार्मिक पोशाखावर बंदी घालावी. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. कर्नाटक उच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ हिजाब प्रकरणी सुनावणी करत आहे. या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, जेएम खाजी आणि न्यायमूर्ती कृष्णा ए दीक्षित यांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास राव यांनी याचिका दाखल केली
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास राव यांनीही याचिका दाखल केली होती. याआधी गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली होती.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. जोपर्यंत हा वाद मिटत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनींना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि असा कोणताही धार्मिक पोशाख घालण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे, त्यामुळे हा वाद अधिकच तापला आहे. विशेष म्हणजे, हिजाबचा वाद कर्नाटकाबाहेरही पसरू लागला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली आहेत.