नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिजाब वादावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आरएसएस(RSS)च्या मुस्लीम शाखेने कर्नाटकच्या बीबी मुस्कान खान या मुलीचं समर्थन केले आहे. हिजाब अथवा पडदा हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आरएसएस मुस्लीम विंग, मुस्लीम राष्ट्रीय मंच हिजाब परिधान करण्यासाठी मुस्कानच्या याचिकेचे समर्थन केले आहे. त्याचसोबत व्हायरल व्हिडीओतील घटनेची निषेध नोंदवला आहे.
मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे प्रांत संचालक अनिल सिंह म्हणाले की, मुस्कान आमच्या समुदायातील एक मुलगी आणि बहीण आहे. संकटाच्या काळात आम्ही तिच्यासोबत उभे आहोत. हिंदू संस्कृती महिलांचा सन्मान करणं शिकवते. ज्यांनी जय श्रीरामचे नारे लावून मुलीवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते चुकीचे आहे. हिजाब परिधान करणे हा त्या मुलीचा वैयक्तिक अधिकार आहे. जर तिने कॅम्पसमध्ये ड्रेस कोडचं उल्लंघन केले असेल तर संस्थेला तिच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच मुलांनी भगवी शाल अंगावर ओढून जय श्रीरामचे नारे देणे हे कृत्य हिंदू संस्कृतीला बदनाम करणारं आहे. हिंदू महिला त्यांच्या आवडीनं पदर चेहऱ्यावर घेतात. हिजाब वा पदर हे भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आरएसएस सरसंघचालकांनी म्हटलंय मुस्लीम आमचे भाऊ आहेत. दोन्ही समुदायाचे डिएनए समान आहेत. मी हिंदू समुदायातील सदस्यांना मुस्लिमांना भावाच्या रुपात स्वीकारण्याचं आवाहन करतो असंही अनिल सिंह यांनी सांगितले.
ओवैसींचा भाजपावर हल्लाबोल
एक मुलगी अनेक वर्षापासून हिजाब परिधान करते. अचानक तुम्हाला तिच्यावर बंदी आणण्याचा विचार कसा आला? अचानक नोटिफिकेशन जारी कसं केले? असा सवाल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसींनी विचारला आहे. मोदी सरकारच्या एका डेटानुसार २१.९ टक्के मुस्लीम मुली ३ ते २५ वर्षातील आहे त्यांनी कधी शिक्षण घेतले नाही. बेटी बचाओ, बेटी पढाओ असा केंद्र सरकारचा नारा आहे. एक मुलगी शाळेत शिक्षणासाठी जातेय तिला का रोखलं गेले? हिजाब आणि नकाब कुरानात लिहिलं आहे. मुस्कान नावाच्या मुलीनं धाडसानं प्रतिकार केला. ते कौतुकास्पद आहे. २० ते २५ युवक मुलांना कॉलेजमधून येण्यापासून रोखतात. या प्रकरणी मतांचं राजकारण का होतंय? असंही ते म्हणाले.
मी हिंदू मित्रांमध्ये स्वत:ला सुरक्षित समजते – मुस्कान
कर्नाटकच्या एका कॉलेजमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिथे मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये येते. तेव्हा तिथे असलेला जमाव तरुणीच्या दिशेने येतो. त्यानंतर या तरुणीच्या समोर घोषणा दिल्या जातात. तेव्हा ही तरुणीही प्रत्युत्तरदाखल घोषणा देताना दिसते. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कर्नाटकच्या मांड्या येथे घडली आहे.
या वादावर मुस्कान म्हणाली की, अनेकांचे मला फोन येत आहेत, माझे मित्र, हिंदू मित्र देखील माझ्या समर्थनार्थ आहेत. मी आणि माझ्या इतर मुस्लीम मैत्रिणी- हिंदू मित्रांमध्ये स्वत:ला सुरक्षित समजते. आमच्यामध्ये कधीही धर्माच्या गोष्टी होत नाहीत. हे सगळे बाहेरचे लोक करत आहेत. मी क्लासमध्ये हिजाब परिधान करते आणि बुरखा काढून टाकते. आजपर्यंत प्राचार्य किंवा टीचर्संने काहीही म्हटले नाही. हे सगळं बाहरेचे लोकं येऊन करत आहेत. हिजाब आमचा एक भाग आहे, तो आमचा धर्म आहे, त्यासाठीचा विरोध आम्ही सुरूच ठेवणार, असे मुस्कानने म्हटले आहे. तसेच, माझ्या कॉलेजमधील शिक्षक आणि प्राचार्यांनी गर्दीपासून मला सुरक्षित ठेवले, असेही तिने सांगितले.