बंगळुरू: कर्नाटकमधील अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब/बुरख्यावरुन वाद सुरू आहे. हा वाद आता न्यायालयात गेला असून, यावर सुनावणी होणार आहे. एकीकडे मुस्लिम विद्यार्थिनी शाळा-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून आपला विरोध नोंदवत आहेत. तर हिंदू विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून आपला विरोध नोंदवत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधींनी ट्विटरवर लिहिले की, 'बिकिनी असो, जीन्स असो, हिजाब असो किंवा डोक्यावर पदर घेणे असो, महिलांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. त्यांच्यावरील अत्याचार थांबवा.' ट्विटच्या शेवटी प्रियांकांनी 'लडकी हूं, लड सकती हूं' या मोहिमेचा हॅशटॅगही टाकला आहे.
प्रियंका गांधी यांचे ट्विट:
शाळा-कॉलेज 3 दिवस बंदधार्मिक पेहरावावर बंदी घालण्याच्या आदेशानंतर कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे गट आमनेसामने आले आहेत. दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. मुस्लिम विद्यार्थी हिजाब बंदी विरोधात आंदोलन करत आहेत, तर अनेक हिंदू विद्यार्थी भगवे गमछे परिधान करुन कॅम्पसमध्ये घोषणा देत आहेत. परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 3 दिवसांसाठी बंद ठेवली आहेत.
उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचा अधिकार बहाल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आजही सुनावणी होणार आहे. मात्र विद्यार्थिनींच्या वकिलाला भाजपने आक्षेप घेतला आहे. विद्यार्थिनींचे वकील हे काँग्रेसचे नेते असल्याचे भाजपचे म्हणणे आहे आणि यावरुन हा वाद भडकावण्यात काँग्रेसचा हात असल्याचे सिद्ध होते, असा आरोप करण्यात येत आहे.
यूपी निवडणुकीत हिजाब वादाचे पडसाद
कर्नाटकच्या हिजाब वादाने यूपीच्या निवडणुकीच्या राजकारणातही प्रवेश केला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भाजप या मुद्यावरून समोरासमोर आले आहेत. हिजाबच्या वादावरुन दिल्ली आणि मुंबईतही निदर्शने सुरू झाली आहेत. मुंबईत समाजवादी पक्ष मुस्लिम विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवत आहे.