बंगळुरू – गेल्या अनेक महिन्यापासून कर्नाटकात सुरू असलेल्या ‘हिजाब’वादावर अखेर कर्नाटक हायकोर्टनं निर्णय दिला. हिजाब हा इस्लाम धर्माचा अनिवार्य भाग नाही. शालेय गणवेशाविरुद्ध विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाही असं सांगत हिजाब प्रकरणातील सर्व याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या. त्यामुळे नाराज झालेल्या एका कॉलेजमधील मुलींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. हिजाब परिधान करून बसलेल्या मुली परीक्षा हॉलच्या बाहेर निघून गेल्या.
कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर लगेच ही घटना घडली. इंडिया टूडेच्या बातमीनुसार, कर्नाटकच्या यादगिर सुरापुरा तालुक्यातील सरकारी कॉलेजमध्ये मुलींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि केंद्रातून बाहेर पडल्या. या विद्यार्थिनी हिजाब परिधान करून परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहचल्या होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजता परीक्षा सुरू होणार होती तर १ वाजता संपणार होती. मात्र तत्पूर्वी कॉलेजच्या प्राचार्यांनी युवतींना हायकोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्यास सांगितले. परंतु त्यांनी ते न ऐकता परीक्षा केंद्राच्या बाहेर जाणं पसंत केले.
कॉलेजनुसार, जवळपास ३५ विद्यार्थिनींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. त्या मुलींनी प्राध्यापकांना सांगितले की, आमच्या पालकांशी चर्चा केल्यानंतरच विना हिजाब आम्ही परीक्षा द्यायची की नाही हे ठरवू. एका युवतीनं म्हटलं हिजाब परिधान करूनच आम्ही परीक्षा देऊ आणि जर ते उतरवण्यास सांगितले तर आम्ही परीक्षा देणार नाही असा पवित्रा मुलींनी घेतला. कर्नाटक हायकोर्टाच्या ३ सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी हिजाब प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला. हिजाब परिधान करणे आवश्यक परंपरेनुसार नाही. शालेय गणवेशाला विद्यार्थी विरोध करू शकत नाही असं सांगितले.
काय आहे प्रकरण?
मागील महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात हिजाब घालून जाणाऱ्या काही विद्यार्थिनींना प्रशासनाने रोखले होते. यानंतर हिजाब विरुद्ध भगवा गमछा वाद सुरू झाला आणि राज्यभर पसरला. त्यानंतर हिंदू विद्यार्थ्यांसमोर अल्ला हु अकबरचा नारा देणाऱ्या मुलीचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर वाद देशभरात पेटला.
काय आहे न्यायालयाचा निकाल?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर कर्नाटकउच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. हिजाबच्या बंदीविरोधात कर्नाटकउच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होता. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे. हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या.
ओवैसी नाराज
असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी जाहीर केली. ते म्हणाले की, ''हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी सहमत नाही. या निकालाशी असहमत असणे हा माझा अधिकार आहे. याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात अपील करतील अशी मला आशा आहे. मला आशा आहे की केवळ AIMPLBच नाही तर इतर धर्माच्या संघटना देखील या निर्णयाविरुद्ध अपील करतील,''असे ट्विट त्यांनी केले.