मुंबई:कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद राजकारणापासून बॉलिवूडपर्यंत उमटले आहेत. या प्रकरणावरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण हिजाबचे समर्थन करत आहे, तर काहीजण याचाविरोध करत आहेत. यातच आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही या हिजाब वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जावेद अख्तर?जावेद अख्तर यांनी मुलींना धमकावणाऱ्या जमावाचा निषेध, तर हिजाबला विरोध केला आहे. जावेद अख्तर यांनी ट्विट केले की- 'मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम आहे. पण, मुलींना धमकावणाऱ्या गुंडांचाही मी निषेध करतो. हा पुरुषार्थ आहे का?' असा प्रश्न जावेद अख्तर यांनी विचारला आहे.
अनेकांनी केला विरोधजावेद अख्तरच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हिजाब वादाचा निषेध केला आहे. यामध्ये स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कमल हसन, ओनीर यांच्या नावांचा समावेश आहे. स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये या घटनेला लज्जास्पद म्हटले होते. हिजाब घातलेल्या मुलीला घेरणाऱ्यांना तिने लांडगा म्हटले. तर, रिचा चढ्ढाने आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्याचे आवाहन केले.
हिजाब वादाचे पडसाद पाकिस्तानातही उमटलेहिजाब वादाचे पडसाद पाकिस्तानातही उमटले आहेत. नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुलींना अशा प्रकारे हिजाब घालून प्रवेश करण्यापासून रोखणे भयावह असल्याचे तिने म्हटले. मलालाने ट्विट करून लिहिले - हिजाब परिधान केलेल्या मुलींना शाळेत प्रवेश करण्यापासून रोखणे हे भयानक आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे.
काय आहे हिजाबचा वाद?कर्नाटकातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरुन गोंधळ सुरू आहे. कर्नाटकातील एका कॉलेजचा व्हिडिओ समोर आला होता. जिथे एक मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या जमावाने मुलीसमोर जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर, मुलगीही अल्लाहू अकबरचा नारा देत उत्तर देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.