हैदराबाद : कर्नाटकमधील अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब/ बुरख्यावरुन वाद सुरू आहे. हा वाद आता न्यायालयात गेला असून, यावर सुनावणी होणार आहे. एकीकडे मुस्लिम विद्यार्थिनी शाळा-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करून आपला विरोध नोंदवत आहेत. तर हिंदू विद्यार्थी भगवे स्कार्फ घालून आपला विरोध नोंदवत आहेत. दरम्यान, या प्रकरणी महिला पुढे येऊन भाष्य करत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी यावर आपले बिनधास्त मत मांडले. त्यानंतर, आता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्यानेही रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे.
कर्नाटक वादावर महिला नेत्या पुढे येऊन आपलं मत व्यक्त करत आहेत. तेलंगणाचेमुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही हिजाब वादावर भूमिका मांडली. काय परिधान करायचं हे महिलांना ठरवू द्या, असे राव यांनी म्हटले. तर, राव यांची कन्या कविता कल्वाकुंतला यांनीही रोखठोक मत मांडलं आहे. कविता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चार लाईन शेअर केल्या आहेत. त्यासोबतच, आपल्या भांगेत कुंकू लावणं ही माझी आवड आहे, आणि हिजाब परिधान करणं ही मुस्कानची आवड आहे. त्यामुळे, कोणते कपडे परिधान करायचे हे महिलांना निश्चित करू द्या, असे कविता यांनी म्हटलं आहे. तसेच,
'हम सभी भारतीय हैं, हमारे चुनाव यह तय नहीं करते कि हम कौन हैं, कोई फर्क नहीं पड़ता कि हम किस धर्म का पालन करने वाले हैं, हम क्या पहनते हैं, आखिर हम सभी भारतीय हैं। अशा आशयाची हिंदी कविताही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं लिहिली आहे.
काय म्हणाल्या हेमा मालिनी
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, भाजप नेत्या खासदार हेमा मालिनी यांनीही मत मांडलं आहे. महिलांच्या त्यांच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार कपडे परिधान करायचा अधिकार संविधानाने दिल्याचं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे. तर, शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. याठिकाणी धार्मिक गोष्टी घेऊन जाऊ नये, प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान व्हायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, ते तुम्ही घालू शकता, असे हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.