बंगळुरू - कर्नाटकात गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या ‘हिजाब’ वादावर अखेर कर्नाटक हायकोर्टनं निर्णय दिला. हिजाब हा इस्लाम धर्माचा अनिवार्य भाग नाही. शालेय गणवेशाविरुद्ध विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत, असं सांगत हिजाब प्रकरणातील सर्व याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या. त्यामुळे नाराज झालेल्या एका कॉलेजमधील मुलींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला होता. तर, कर्नाटकातील प्री युनिव्हर्सिटी 2 च्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थींनींनी निर्णयाविरुद्ध आंदोलन केले होते. या विद्यार्थ्यांबाबत युनिव्हर्सिटीने मोठा निर्णय घेतला आहे.
महाविद्यालयात हिजाब बंदीच्या निर्णयानंतर प्री युनिव्हर्सिटीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होत असलेल्या प्रॅक्टीकल परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. कर्नाटकात बारावीच्या परीक्षेलाल प्री युनिव्हर्सिटी 2 असे म्हटले जाते. कर्नाटक सरकारने दुसऱ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात विचार करण्याचे म्हटले होते. मात्र, कर्नाटक सरकारने आता रि-एक्झामचा पर्याय स्पष्टपणे नाकारला आहे. बोर्ड परीक्षेसाठी आयोजित प्रॅक्टीकल परीक्षेत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टीकल एक्झामचा बहिष्कार केला होता, त्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी याबाबत बोलताना स्पष्टच सांगितले की, उच्च न्यायालयाच्या एखाद्या निर्णयाविरोधात या विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करुन परीक्षा देण्यास बसवता येणार नाही. त्यामुळेच, ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल परीक्षेला अनुपस्थिती होती, त्यांची पुनर्परिक्षा घेणे उचित नाही. कारण, त्यांची परीक्षा घेतल्यास पुन्हा आणखी एखादा विद्यार्थी दुसरे कारण सांगून अशारितीने परीक्षेवर बहिष्कार टाकू शकतो, ते योग्य नाही, असेही नागेश यांनी म्हटले.
हायकोर्टाचा निर्णय येताच परीक्षा सोडली
कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतरही लगेच काही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्धवट सोडली होती. इंडिया टूडेच्या बातमीनुसार, कर्नाटकच्या यादगिर सुरापुरा तालुक्यातील सरकारी कॉलेजमध्ये मुलींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि केंद्रातून बाहेर पडल्या. या विद्यार्थिनी हिजाब परिधान करून परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहचल्या होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजता परीक्षा सुरू होणार होती तर १ वाजता संपणार होती. मात्र, तत्पूर्वी कॉलेजच्या प्राचार्यांनी युवतींना हायकोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्यास सांगितले. परंतु त्यांनी ते न ऐकता परीक्षा केंद्राच्या बाहेर जाणं पसंत केले.
काय आहे न्यायालयाचा निकाल?
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर कर्नाटकउच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. हिजाबच्या बंदीविरोधात कर्नाटकउच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होता. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे. हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या.