जेरुसलेम : येमेनच्या हौथी बंडखोरांनी भारतातील गुजरातकडे निघालेल्या इस्रायलच्या एका मालवाहू जहाजाचे अपहरण केले असून, जहाजावरील २५ जणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे इस्रायल-हमास युद्धात तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, समुद्रात युद्ध भडकण्याची भीती वाढली आहे.
इराणचे समर्थन असलेल्या हौथी बंडखोरांनी सांगितले की, अपहरण केलेले जहाज इस्रायलशी संबंधित आहे. गाझामध्ये इस्रायलने सुरू ठेवलेला नरसंहार जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुद्र क्षेत्रात इस्रायलच्या मालकीच्या किंवा त्यांच्या संबंधित जहाजांवर हल्ले करणे सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनीही खात्री केली की, रविवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या वेळी हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात गॅलेक्सी लीडर जहाजाचे अपरहण केले आहे.
जपान म्हणतो...मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो म्हणाले की, जपान सरकार बंडखोरांशी वाटाघाटी करत आहे. ते इस्रायलशीही वाटाघाटी करत आहे आणि सौदी, ओमान आणि इराणच्या सरकारांशी सहकार्य करत आहे.
ओलीस कुठचे? जहाजाचे जपानी ऑपरेटर एनवायके लाइनने म्हटले की, अपहरणावेळी जहाजावर माल नव्हता. क्रू सदस्य फिलिपाइन्स, बल्गेरिया, रोमानिया, युक्रेन आणि मेक्सिकोचे आहेत.
ही फक्त सुरुवात आहे. इस्रायली लोकांना फक्त “बळाची भाषा” समजते. इस्रायली जहाजाचे अपहरण करणे हे एक व्यावहारिक पाऊल आहे, जे परिणामांची पर्वा न करता सागरी युद्ध छेडण्यात येमेनी सशस्त्र दलांचे गांभीर्य सिद्ध करते- मोहम्मद अब्दुल-सलाम, हौथीचा प्रवक्ता