अलाहाबाद - उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने जाळपोळ करत हिंसाचाराला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी बसची जाळपोळ करत एका खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अलाहाबाद विद्यापीठाच्या ताराचंद हॉस्टेलबाहेर राजेश यादव यांची पहाटे अडीच वाजता गोळी घालून हत्या करण्यात आली. राजेश यादव यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी ते गेले होते. यावेळी काही लोकांसोबत त्यांचा वाद झाला. वाद झाल्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरु झाली. यानंतर एका व्यक्तीने त्यांना गोळी घातली.
राजेश यादव यांना त्यांच्या मित्राने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. गोळी घातल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेश यादव यांच्या गाडीत आम्हाला दोन मोकळी काडतूसं सापडली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
आज सकाळी 50 जणांच्या जमावाने रुग्णालयावर हल्ला करत तोडफोड केला. यावेळी जमावाने तिथे उपस्थित पत्रकारांनाही मारहाण केली. जमावाने पत्रकारांचे मोबाइल हिसकावून घेत, तोडफोड केली. जमावाने बसेसचीदेखील तोडफोड केली. राजपाल यादव यांची जिथे हत्या झाली होती तिथे आधी जमाव गोळा झाला होता. त्यानंतर त्यांनी हॉस्पिटल आणि बसची तोडफोड केली.
राजेश यादव यांनी बहुजन समाज पक्षाकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढली होती. ग्यानपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. समाजवादी पक्षातून बंडखोरी करुन भाजपात प्रवेश केलेल्या महेंद्र कुमार बिंद यांचा विजय झाला होता. राजेश यादव तिस-या क्रमांकावर राहिले होते. जिथे राजेश यादव यांची हत्या झाली तिथून त्यांचं निवासस्थान काही अंतरावरच होतं. घटनेनंतर शहरातील परिस्थिती चिघळली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.