नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. मुंबईत शुक्रवारी (31 ऑगस्ट) पेट्रोल 21 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 30 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 85.93 दर तर डिझेलचा प्रतिलिटर दर 74.54 झाला आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 28 पैशांनी प्रतिलिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 78.52 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 70.21 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
पेट्रोलच्या दरवाढीने जनतेचे हाल, सरकार मात्र मालामाल
तेलाच्या किंमतीबाबत यूपीए सरकारवर भाजपा सतत टीका करीत असे. पण मोदी यांचे सरकार आज काहीही कारणे सांगो, पण तेलाच्या या खेळात सरकार मालामाल होत आहे. लोकांना 2012 च्या तुलनेत आज फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे. सरकारच्या तिजोरीत कराद्वारे येणारा महसूल वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2012 मध्ये तेलाच्या किंमती प्रति बॅरल 109.45 डॉलर असताना दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी 68.48 व मुंबईत 74.23 रुपये मोजावे लागत होते. आज कच्च्या तेलाच्या किंमती 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. पण, दिल्ली, मुंबईत पेट्रोलसाठी लोकांना अनुक्रमे 78 व 85 रुपये द्यावे लागत आहेत.