नवी दिल्ली : वडिलांचे ३८ लाख रुपये चोरून दिल्लीतील १४ वर्षांच्या मुलीने मैत्रिणींसह सहल केल्याचे आणि आपला गुन्हा लपविण्यासाठी चोरी व अपहरणाचे कुभांड रचल्याची घटना दिल्लीत अलीकडे उघडकीस आली.मंगळवारी येथील एका बिल्डरच्या घरातून ३८ लाख चोरीला गेले. यानंतर गुरुवारी या बिल्डरच्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाले. याचदिवशी तिच्या तीन मैत्रिणीही बेपत्ता झाल्या. बिल्डरच्या मुलीनेच मौजमजा करण्यासाठी आपल्याच घरातून ३८ लाख रुपये चोरल्याचे आणि आपला गुन्हा लपविण्यासाठी चोरी व अपहरणाचे कुभांड रचल्याचे समोर आले. १४ वर्षीय नित्या (बदललेले नाव) हीच या योजनेची सूत्रधार होती. नित्या रोजच्या आयुष्याला कंटाळली होती. याचदरम्यान एका विदेशी टीव्ही शोचा भारतात रिमेक बनत असल्याचे तिने ऐकले. या मूळ शोमध्ये सर्व महिला कलाकार काम करतात. या रिमेकचा भाग बनण्याच्या इराद्याने नित्याने घरातून पळून जाण्याची योजना बनवली. चौघींचेही मोबाईल दिल्लीत स्वीच आॅफ झाल्याचे पोलिसांना कळले. याचदरम्यान संबंधित मुलींना टॅक्सीत बसताना पाहिल्याची बातमी एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सुमारे ४०० टॅक्सी चालकांना विचारपूस केली आणि पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
३८ लाख चोरून मुलीची मैत्रिणींसह सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2015 11:50 PM