Himachal Results 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसला ‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती, आमदारांसंदर्भात घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:57 AM2022-12-08T10:57:35+5:302022-12-08T10:58:29+5:30
Himachal Assembly Election Results 2022 : "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्याकडे देण्यात आलीय मोठी जबाबदारी."
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. येथे भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात काट्याची टक्कर दिसत आहे. यातच, आता काँग्रेसला घोडेबाजार होण्याची भीती सतावू लागली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजप आपल्या विजयी आमदारांना फोडेल, अशी भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. ही शक्यता आणि तथाकथित 'ऑपरेशन लोटस' लक्षात घेत काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला हलविण्याची योजना आखली असल्याची माहिती आहे. एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रियांका गांधींचेही लक्ष -
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) स्वतः देखील या संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. एवढेच नाही, तर त्या आज शिमल्याला पोहोचण्याचीही शक्यता आहे. मात्र, हिमाचल प्रदेशात जनता पुन्हा भाजपला संधी देणार, की काँग्रेसला हे काही वेळातच निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
हिमाचलमध्ये कुणाचं सरकार? -
हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. या निवडणुकीत राज्यातील एकूण 55 लाख मतदारांपैकी सुमारे 75 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हिमाचल प्रदेशातील विधानसभेत एकूण 68 सदस्य असतात. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. या सर्वांच्या भविष्याचा निर्णय आज लागेल. काँग्रेसला आपल्या विजयाची पूर्ण खात्री आहे. तर भाजपही आपणच पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे.