Himachal Byelection Result: ७० वर्षाची प्रथा मोडली; मंडीमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं इतिहास रचला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 09:37 AM2021-11-03T09:37:09+5:302021-11-03T09:37:32+5:30
१९९६ मध्ये जेव्हा पंडित सुखराम यांचा विजय झाला त्यावेळी अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. परंतु अवघे १३ दिवस हे सरकार चाललं.
मंडी – हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा पोटनिवडणुकीत ७० वर्षाची प्रथा काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं मोडली आहे. या मतदारसंघातून निवडून आलेला खासदार सर्वाधिक १३ दिवस विरोधी बाकांवर बसला आहे. मात्र आता पुढील ३ वर्ष मंडी लोकसभेत निवडून आलेला खासदार विरोधी बाकांवर बसणार आहे. मंडी लोकसभा जागेबाबत इतिहास पाहिला तर याठिकाणी १९५२ मध्ये दोन सदस्य निवडून आले होते. त्यावेळी गोपी राम आणि रानी अमृतमौर खासदार बनल्या होत्या.
त्यानंतर १९५७ च्या मंडीचे राजा जोगिंदर सेन, १९६२ आणि १९६७ मध्ये सुकेतचे राजा ललित सेन, १९७१ मध्ये वीरभद्र सिंह निवडणुकीत जिंकले होते. या सर्वांच्या काळात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. १९७७ मध्ये ठाकूर गंगा सिंह जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर केंद्रात जनता पार्टीचं सरकार आलं. १९८० मध्ये वीरभद्र सिंह जिंकले आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता आली. १९८४ मध्ये पंडित सुख राम यांचा विजय झाला. ते इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये सहभागी होते. १९८९ मध्ये जेव्हा या मतदारसंघातून भाजपाचे महेश्वर सिंह जिंकून आले तेव्हा केंद्रात भाजपाच्या पाठिंब्याने वीपी सिंह यांचं सरकार बनलं. १९९१ मध्ये पंडित सुखराम जिंकले ते संचार मंत्री झाले. १९९६ मध्ये पुन्हा पंडित सुखराम जिंकले आणि केंद्रात काँग्रेसच्या पाठिंब्यानं देवगौडा सरकार बनलं.
१९९६ मध्ये जेव्हा पंडित सुखराम यांचा विजय झाला त्यावेळी अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. परंतु अवघे १३ दिवस हे सरकार चाललं. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार बनलं. १९९८, १९९९ मध्ये भाजपाचे महेश्वर सिंह खासदार बनले आणि केंद्रात भाजपा अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर प्रतिभा सिंह यांनी विजय मिळवला. तर २००९ मध्ये वीरभद्र सिंह निवडून आले. दोन्ही वेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. २०१३ मध्ये पोटनिवडणुकीत प्रतिभा सिंह निवडून आल्या. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे रामस्वरुप शर्मा खासदार बनले. तेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. परंतु पोटनिवडणुकीत ७० वर्षापासून सुरु असलेली प्रथा मोडली.