Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu ( Marathi News ) : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेलं क्रॉस वोटिंग आणि काही वेळापूर्वी विक्रमादित्य सिंह यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा पार्श्वभूमीवर आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधील आमदार आणि मंत्र्यांच्या नाराजीमुळे सुखविंदर सिंह सुख्यू यांनी राजीनामा दिल्याचे समजते. मात्र याबाबत अद्याप स्वत: सुखविंदर सुख्यू किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
राज्य सरकारकडून माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा अवमान होत असल्याचं सांगत त्यांचे पुत्र आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आज सकाळी घेतला. तसंच काँग्रेसच्या सहा आमदारांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता असताना आता थेट मुख्यमंत्र्यांनीच आपला राजीनामा देऊ केला आहे.
आजच नवा मुख्यमंत्री मिळणार?
हिमाचल प्रदेशातील सरकार वाचवण्यासाठी जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर सोपवली असून मुख्यमंत्र्यांना हटवावं लागलं तरी चालेल पण सरकार कोसळता कामा नये, अशा सूचना काँग्रेस नेतृत्वाकडून या दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशानेच मुख्यमंत्री सुख्यू यांनी राजीनामा दिल्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आजच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करत आमदारांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.