हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे, मुख्यमंत्रिपदासाठी आता नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासाठी गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसच्या बैठका सुरू आहेत. सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी सुखविंदर सिंग सुखू आणि मुकेश अग्निहोत्री यांची नावे हायकमांडकडे पाठवण्यात आली होती. आता हायकमांडने सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयानंतर अग्निहोत्री आणि प्रतिभा यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
PAN card: ...तर तुमचं पॅनकार्ड होणार निष्क्रिय, त्वरित आटोपून घ्या हे काम, सरकारने घेतला मोठा निर्णय
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या वतीने एकमताने ठराव मंजूर करून विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे अधिकार पक्षाध्यक्षांना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पदासाठी सकाळपासूनच मंथन सुरू आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश पटेल आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षक - सिमला येथील सेसिल यात उपस्थित आहेत.
आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सुखविंदर सिंग सुखू हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, सुखविंदर सिंग सुखू यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. याबाबत मला अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असं त्यांनी सांगितले आहे. थोड्याच वेळात विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, हायकमांडचे आदेश मान्य केले जातील, असंही ते म्हणाले.
हिमाचल प्रदेशच्या ६८ सदस्यीय विधानसभेत काँग्रेसने ४० जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि गुरुवारी निकाल जाहीर झाला. हिमाचल प्रदेशमधील एआयसीसी प्रभारी राजीव शुक्ला यांच्यासह निरीक्षकांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली आणि पक्षाच्या विजयी आमदारांची यादी देऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ मागितला.