मोदी आणि भाजपासमोर आमचा पक्ष कमकुवत, काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्याकडून घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 09:33 AM2024-03-02T09:33:52+5:302024-03-02T09:34:24+5:30
Himachal Congress President Pratibha Singh: हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे. प्रत्यक्ष मैदानावरील संघर्षात काँग्रेस भाजपाच्या तुलनेत कमकुवत दिसत आहे, असा दावा प्रतिभा सिंह यांनी केला आहे.
राज्यसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सहा बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यानंतरही राज्यातील काँग्रेससमोर उभं ठाकलेलं संकट टळलेलं नाही. या बंडखोर आमदारांनी कायदेशीर लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे. विक्रमादित्य सिंह हे या बंडखोर आमदारांशी चर्चा करत आहेत. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यातील सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे. प्रत्यक्ष मैदानावरील संघर्षात काँग्रेस भाजपाच्या तुलनेत कमकुवत दिसत आहे, असा दावा प्रतिभा सिंह यांनी केला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करताना प्रतिभा सिंह म्हणाल्या की, विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयामुळे बंडखोर आमदार निश्चितपणे नाराज झाले असतील. त्यांच्याही काही मागण्या होत्या. राजेंद्र राणा हे हमीरपूर येथून निवडून आले आहेत. त्यांनी प्रेम कुमार धुमल यांना पराभूत केले होते. आपल्याला कुठेतरी सामावून घेण्यात यावं, अशी त्यांची वर्षभरापासूनची इच्छा होती. जर त्यांना कुठेतरी सामावून घेतलं असतं तर असं संकट आलं नसतं. आता इतर सर्व आमदार एवढ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आहेत की तुम्ही त्यांच्याशी बोलूही शकत नाही. त्यांचे फोनही बंद आहेत. आता पुढे काय घडामोडी घडतात आणि हायकमांड काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. माझी सध्या तिन्ही पर्यवेक्षकांशी चर्चा झाली आहे.
भाजपाची निवडणुकीची तयारी ही काँग्रेसपेक्षा अधिक चांगली असल्याचेही प्रतिभा सिंह यांनी मान्य केले. त्या म्हणाल्या की, मी माननीय मुख्यमंत्र्याना हेच सांगत होते की, तुम्ही संघटना मजबूत केली तरच आम्ही येणाऱ्या निवडणुकीत सक्षमपणे लढू शकतो. हा आमच्यासाठी खूप कठीण काळ आहे. प्रत्यक्ष फिल्डवर भाजपा काय करण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे, हे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वारंवार आग्रह केला आहे. निवडणूक ही निवडणूक असते. त्यात लढून विजय मिळवायचा आहे.
संघटनात्मकदृष्ट्या कोण भक्कम आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रतिभा सिंह यांनी सांगितले की, काँग्रेसला आता खूप काही करण्याची आवश्यकता आहे. मी एक खासदार म्हणून माझ्या मतदारसंघाचा वारंवार दौरा केला आहे. मी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.त्यांच्याशी बोलून त्यांच्यासमोरील अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपाची काम करण्याची पद्धत आमच्यापेक्षा चांगली आहे, हेही खरं आहे, असेही त्यांनी सांगितले.