आता हिमाचल प्रदेशात महिलांकडून केवळ 50 टक्केच बस भाडे घेतले जाईल. तसेच, राज्यात 125 युनिटपर्यंत मोफत घरगुती वीज दिली जाईल, अशी घोषणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी केली आहे. ते हिमाचल दिनानिमित्त चंबा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यापूर्वी, हिमाचलमध्ये 60 युनिटपर्यंत मोफत घरगुती वीज दिली जात होती. याच बरोबर, ग्रामीण भागात पाणीही मोफत दिले जाणार आहे, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच, ग्रामीण भागांतील पाण्याच्या बिलातून जलशक्ती विभागाला तब्बल 30 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पोलीस आणि इतर जवानांच्या तुकड्यांकडून मार्च पास्टची सलामी घेतली. एनसीसी, एनएसएस पोलीस बँडसह एकूण 12 तुकड्यांनी परेडमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्च पास्टमध्ये भाग घेणाऱ्या तुकडीच्या टीम लिडरचाही सन्मान केला
यांना देण्यात आला नागरी सेवा, प्रेरणास्रोत आणि हिमाचल गौरव पुरस्कार -हिमाचल दिनानिमित्त आयोजितकार्यक्रमात, राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा प्रशासन किन्नौरला सिव्हिल सेवा अवार्ड देण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांमार्फत जिल्हा कुल्लू आणि किन्नौरच्या उपायुक्तांनाही सिव्हिल सेवा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच, प्रेरणा स्रोत पुरस्कार, जोगिंदरनगरचे टेकचंद भंडारी, किन्नौरमधील कल्पा येथील सरण नेगी, धर्मशाळा येथील स्वयंसेवी संस्था क्रांतीचे अध्यक्ष धीरज महाजन आणि हारमनी ऑफ द पाइन्स हिमाचल प्रदेश पोलीस बँडला, देण्यात आला.
याशिवाय, हिमाचल गौरव पुरस्कार सिरमौर जिल्ह्यातील देवठी माझगाव येथील पद्मश्री विद्यानंद सराईक, चंबा येथील ललिता वकील, मरणोपरांत बाबा इकबाल सिंह आदींना देण्यात आला आहे.