दिल्लीतील महापालिकांतील सत्ता गमावणार आणि गुजरात राखणार असे आज एक्झिट पोल आले आहेत. परंतू, हिमाचल प्रदेशमध्येभाजपाचा जीव टांगणीला लागला आहे. इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया, पी मार्क, जन की बात आणि ETG-TNN च्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस राज्यात पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळत आहे.
गुजरातमध्ये भाजपा जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. आपने काँग्रेसची मते मिळविल्याने त्याचा थेट परिणाम भाजपाच्या जागा वाढण्यात होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर दिल्लीत आपने भाजपाची १५ वर्षांपासुनची सत्ता उलथवून टाकण्याएवढी मजल मारली आहे. असे असताना देशाचे हिमाचल प्रदेशमधील एक्झिट पोलकडे लक्ष लागले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत येण्यासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे.
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियानुसार सत्ताधारी भाजपाला 24-34 जागा, काँग्रेसला 30-40, आपला भोपळा आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पी मार्कनुसार भाजपाला काठावर सत्ता राखताना दाखविले आहे. भाजपाला 34-39, काँग्रेसला 28-33, आपला एक जागा दाखविण्यात आली आहे. जन की बातचेही आकडे तसेच आहेत. भाजपाला 32-40, काँग्रेसला 27-34, इतरांना १-२ जागा दाखविण्यात आल्या आहेत.
ETG-TNN नुसार भाजपाला ३८, काँग्रेसला २८, इतरांना दोन जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर टीव्ही ९ नुसार भाजपाला ३३, काँग्रेसला ३१ आणि इतरांना ४ जागा दाखविण्यात आल्या आहेत.
ही हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाहता भाजपा काठावर पास होण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेसाठी इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसही त्याच आसपास असल्याने काँग्रेसलाही सत्ता स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.